News Flash

कर्करोग रुग्णालयाचा मार्ग मोकळा

 रुस्तमजी गृहसंकुलातील हा भूखंड ठाणे महापालिकेस ‘टाऊन सेंटर’ या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाली आहे.

माजिवड्यातील भूखंड नाममात्र शुल्कात भाडेपट्ट्यावर देण्यास मंजुरी

ठाणे : माजिवडा परिसरातील रुस्तमजी गृहसंकुलामधील ठाणे महापालिकेच्या टाऊन सेंटरच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारणीचा मार्ग अखेर राज्य सरकारने मोकळा केला आहे. २४ हजार चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ आणि संलग्न असलेला १२ हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड जितो एज्युकेशनल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल या संस्थांना वार्षिक एक रुपया इतक्या नाममात्र शुल्कात ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.

रुस्तमजी गृहसंकुलातील हा भूखंड ठाणे महापालिकेस ‘टाऊन सेंटर’ या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाली आहे. तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात ही जागा खासगी उद्योगांना भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ठाणे महापालिकेने कोविड काळात या ठिकाणी सुसज्ज असे रुग्णालय उभारले आणि हा प्रस्ताव मागे पडला. यानंतर या जागेत कर्करोग रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव पुढे आला. टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने येथे अद्ययावत कर्करोग रुग्णालय उभारण्याच्या या प्रस्तावास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.  महापालिकेच्या मालकीची असलेली इतकी मोक्याची आणि मोठी जागा या संस्थांना विनाशुल्क देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. मात्र, कर्करोग रुग्णालय उभारणी महत्त्व मांडून पालिका प्रशासनाने या निर्णयाचे समर्थन केले. टाटा मेमोरिअल सेंटरचा या प्रकल्पात समावेश असला तरी दुसरी भागीदार संस्था असलेल्या जितो ट्रस्टबद्दल ठाण्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या. शहरातील एक बडा राजकीय नेता आणि ट्रस्टमधील पदाधिकाऱ्यांचे असलेल्या मधुर संबंधांची चर्चाही होत होती. असे असले तरी कर्करोग रुग्णालयाचे महत्त्व जाणून सर्वच पक्षांनी या प्रस्तावास मान्यता दिली होती.

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असली तरी इतकी मोठी जागा विनाशुल्क हस्तांतरित करण्यात कायदेशीर अडचणी होत्या. महापालिका प्रांतिक अधिनियमातील तरतुदीनुसार चालू बाजार किमतीपेक्षा महापालिकेला मिळणारा मोबदला कमी असता कामा नये अशी महत्त्वाची अट आहे. त्यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला होता.

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने ती अडचण दूर केली आहे. वर्षाला एक रुपया इतके भाडेपट्टा शुल्क आकारून हा भूखंड ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्यास या विभागाने मान्यता दिली आहे. ही मान्यता देत असताना या दोन संस्थांसोबत महापालिकेच्या त्रिपक्षीय करारासदेखील मंजुरी देण्यात आली आहे. या इमारतीची मालकी महापालिकेकडे कायम ठेवण्यात आली असून कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक सुविधा कमी दरात उपलब्ध करून दिली जाईल असा दावा या प्रस्तावात करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 12:46 am

Web Title: make way for a cancer hospital tata memorial center akp 94
Next Stories
1 निर्बंध हटताच बेफिकिरीमुळे गर्दी
2 ‘स्मार्ट सिटी’च्या निधीत भ्रष्टाचार?
3 लसीकरण मोहिमेत नवा उत्साह
Just Now!
X