20 September 2020

News Flash

Coronavirus :  भिवंडीतही करोनामुक्तीचा ‘मालेगाव पॅटर्न’

शिक्षक, स्वयंसेवी संस्थांमार्फत गल्लीबोळांत सर्वेक्षण

प्रतिकात्मक छायाचित्र

चाचण्यांची संख्या, विलगीकरणात वाढ; शिक्षक, स्वयंसेवी संस्थांमार्फत गल्लीबोळांत सर्वेक्षण

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : करोना संसर्गाने थैमान घातलेल्या भिवंडी शहरात जुलै महिन्यापासून नवे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी संसर्ग कमी करण्यासाठी हाती घेतलेला ‘मालेगाव पॅटर्न’ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील करोना चाचण्यांची संख्या वाढवत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण वाढविण्यात आले असून शिक्षक, स्वयंसेवी संस्था, धर्मगुरूंची मदत घेत शहरातील गल्लीबोळांत सुरू असलेले सर्वेक्षणही लक्षवेधी ठरू लागले आहे. गेल्या २० दिवसांपासून येथील संक्रमित क्षेत्रांतील करोनाबाधितांचा आकडा काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे.

ठाणे जिल्ह्यातील दाट लोकवस्ती असलेल्या भिवंडी शहरात जून महिन्यामध्ये करोना संसर्गाचे प्रमाण हाताबाहेर जाऊ लागले होते. येथील आरोग्य यंत्रणा मोडकळीस आल्याने करोना रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले होते. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची बदली करून त्याजागी मालेगावचा करोना संसर्ग आटोक्यात आणण्याचा अनुभव असलेल्या डॉ. पंकज आशिया यांची नियुक्त केली. डॉ. आशिया यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारताच दोन दिवस शहरातील करोना स्थितीचा आढावा घेऊन मालेगावप्रमाणे भिवंडीतील करोना आटोक्यात आणण्यासाठी चार कलमी कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार शहरातील प्रतिदिन करोना चाचण्यांचे प्रमाण ७० ते ८० वरून ४०० पर्यंत वाढवण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्वप्रथम शिघ्र प्रतिजन चाचण्यांचा प्रयोग भिवंडी शहरात करण्यात आला. सुरुवातीला एका रुग्णाच्या संपर्कातील ७ ते ८ व्यक्तींच्या विलगीकरणाचे प्रमाण नव्या उपाययोजनेनुसार १६ वर नेण्यात आले आहे. यासह शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणांच्या सर्वेक्षणावर भर देण्यात आला.

शहरात या उपाययोजना करत असतानाच आयुक्तांनी येथील रुग्णालयांमधील खाटांची संख्या दोन हजारांवर नेली. येथील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पूर्वी शहराबाहेर उपचारांसाठी जाव्या लागणाऱ्या भिवंडीतील करोना रुग्णांना शहरातल्या शहरात योग्य उपचार मिळू लागले आहेत. या प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे दिवसाला ८० ते १०० रुग्ण आढळणाऱ्या भिवंडी शहरात आता दररोज ३५ ते ५० नवे रुग्ण आढळत आहेत. तर, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही आटोक्यात आले आहे.

स्थानिक नगरसेवक, डॉक्टर, मौलवींची मदत

महापालिका प्रशासनाने मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या भिवंडी शहरातील मशिदीच्या मौलवी-मौलाना यांची करोना जनजागृतीसाठी मदत घेतली. स्थानिक दवाखान्यांमधील डॉक्टरांसोबत समन्वय साधून त्यांच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या करोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती पालिकेने गोळा केली.  तसेच स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून प्रभावी उपाययोजना राबवल्याने शहरातील करोना रुग्णांची संख्या आणि करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी येत्या काही दिवसांत शहरातील प्रतिदिन होणाऱ्या करोना चाचण्या ७०० पर्यंत वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

-डॉ. पंकज आशिया, आयुक्त, भिवंडी-निजामपूर महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:45 am

Web Title: malegaon pattern in bhiwandi to reduce coronavirus infection zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 जिल्ह्यात अखेर चाचण्यांची संख्या वाढणार
2 स्वतंत्र नगरपालिकेसाठी १२ हजार हरकती
3 वैद्यकीय पदांची मोठी भरती
Just Now!
X