डोंगर पायथ्यांशी असलेल्या नागरिकांना घरे रिकामी करण्याचे पालिकेचे आवाहन

पुणे जिल्ह्य़ातील माळीण येथील दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या नागरी वसाहतींचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा जमीन खचण्याचा धोका असलेल्या २६ ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत शहरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावातील दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर गेल्यावर्षी महापालिका प्रशासनाने अशा ठिकाणांची यादी तयार केली होती. यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा ही यादी जाहीर करत अशा वस्त्यांमधील रहिवाशांनी घरे रिकामी करावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मान्सून काळातील संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिकेने बजावलेल्या नोटिसींनंतरही या भागातील रहिवाशांनी गेल्यावर्षीपासून घरे रिकामी केलेली नाहीत. असे असतानाच महापालिका प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या यादीतील ठिकाणांमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आवाहनाला रहिवाशी किती दाद देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावात दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत सुमारे दोनशे जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने गेल्यावर्षीपासून संपूर्ण शहरात सर्वेक्षण करून जमीन खचणाऱ्या भागांची यादी तयार केली होती. त्याचप्रमाणे यंदाही महापालिकेने नव्याने सर्वेक्षण केले असून त्याआधारे जमीन खचणाऱ्या २६ ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. प्रभाग समितीनिहाय जाहीर करण्यात आलेल्या यादीत रायलादेवी प्रभाग समिती क्षेत्रात १२, माजिवडा मानपाडा क्षेत्रात दोन, कळवा क्षेत्रात सहा, मुंब्रा क्षेत्रात पाच आणि वर्तकनगर क्षेत्रात एक अशी एकूण २६ ठिकाणे आहेत. प्रभाग समितीमधील आकडेवारी लक्षात घेता वागळे, कळवा आणि मुंब्रा भागात अशा प्रकारची सर्वाधिक ठिकाणे असल्याचे दिसून येत आहे. मान्सून काळात या भागातील जमीन खचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच अशा घटनेत मोठी जीवित हानीसुद्धा होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने  रहिवाशांना नोटिसा बजावताना पावसाळ्यापूर्वी घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.  गेल्यावर्षीही अशाच प्रकारे पालिकेने नोटीस बजावण्यापुरतीच कारवाई केली पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नव्हती. आता पुन्हा नव्याने नोटिसा बजावण्यात येत आहेत.

भूस्खलनाची ठिकाणे

संतोषनगर, पाटीलनगर, डक्ट लाइन, रेल्वे कॉलनी, एसटी उलाई शाळा, हनुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रुपादेवी, भास्करनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केनीनगर, कैलासनगर, आझादनगर, सैनिकनगर, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कशेळीपाडा, गुरदेव आश्रम आणि उपवन.