मनुष्यबळाअभावी काम रखडले; वाहतूक कोंडीत भर

वसई : वसई पूर्वेत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या मालजीपाडा या ठिकाणी नागरिकांच्या सोयीस्कर प्रवासासाठी मागील दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या उड्डाणपुलाच्या कामाची रखडपट्टी सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. करोनाच्या संकटामुळे काम करण्यासाठी कामगार मिळत नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून हे काम रखडले आहे.

वसई पूर्वेतील भागात मुंबईसह इतर भागांना जोडणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. या महामार्गाच्या लगतच मालजीपाडा, ससूपाडा, ससूनवघर, बोबतपाडा अशी गावे आहेत. या गावांतील नागरिकांना दररोज महामार्ग ओलांडूनच धोकादायक प्रवास करावा लागत होता. यासाठी अनेक वर्षांपासून येथील नागरिक उड्डाणपूल व पादचारी पूल तयार करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करत होते. त्यानुसार या ठिकाणी फेब्रुवारी २०२० मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अवघा एक ते दीड महिना या पुलाचे काम सुरू राहिले. त्यानंतर करोना विषाणूने डोके वर काढल्याने हे काम बंद करावे लागले. मागील चार महिन्यांपासून काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या उड्डाणपुलाचे काम करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे ‘आयआरबी’ने सांगितले आहे. आता पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे या कामासाठी मातीभराव करण्यासाठी मातीसुद्धा मिळू शकत नाही, त्यामुळे हे काम आता पावसाळ्यानंतरच सुरू होईल, असे ‘आयआरबी’ने सांगितले आहे. परंतु सध्या हे काम अर्धवट राहिल्याने येथून ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

पुलाच्या कामाला गती देण्याची मागणी

उड्डाणपूल नसल्याने दररोज या गावातील नागरिकांना महामार्ग ओलांडून प्रवास करावा लागत आहे. आतापर्यंत मालजीपाडा गावातील तीसपेक्षा जास्त नागरिकांचा धोकादायक प्रवास करताना अपघात झाला आहे. यासाठी उड्डाणपूल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तेसुद्धा काम बंद झाले. आता खोदकाम करण्यापलीकडे दुसरे कोणतेच काम केले नाही. यासाठी लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतुकीवर परिणाम

उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गवर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. याचा परिणाम या महार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर होऊ  लागला आहे. याआधीच या मार्गावर अधूनमधून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. त्यातच आता हे काम रखडले असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.