व्यापारी, कर्मचाऱ्यांमध्ये समाधान; चित्रपटगृह, उपाहारगृह आणि रेस्टॉरंट बंदच

भाईंदर : पाच महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर  सोमवारपासून मीरा-भाईंदर शहरातील मॉल्स उघडे करण्याची परवानगी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे मॉल्समधील व्यापारी आणि कर्मचारी  वर्गाने समाधान व्यक्त केले.

मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाने मॉलवरील निर्बंध उठविले असले तरी सामाजिक अंतराचे व इतर नियमांचे व्यवस्थापनाने पालन न केल्यास मॉल पुन्हा बंद  करण्याचा इशारा दिला आहे. ५ ऑगस्टपासून राज्यातील मॉलवरील निर्बंध राज्य सरकारने उठविले होते. मात्र मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने शहरातील परिस्थिती नियंत्रणात न असल्यामुळे सर्व मॉल्स बंदच ठेवण्यात आले होते. पालिका प्रशासनाने ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मॉल सुरू करण्याची नियमावली जाहीर केली. त्यात चित्रपटगृह, उपाहारगृह आणि रेस्टोरंट बंदच राहणार आहेत.

सोमवारपासून नियमावलीसह शहरातील मॉल सुरू करण्यात आले आहेत. मॉलच्या प्रवेशद्वारावरच जंतुनाशक फवारणी आणि तापमान तपासणी केल्यानंतरच ग्राहकांना आत सोडले जात आहे. तसेच ग्राहकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. मीरा-भाईंदर शहरात ठाकूर मॉल आणि मॅक्सस मॉल असून यात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पहिल्या दिवशी प्रतिसाद थंड

पाच महिन्याच्या काळानंतर सुरू करण्यात आलेल्या मॉल्सना पहिल्या दिवशी नागरिकांनी थंड प्रतिसाद दिला. अद्यापही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे आढळून आले. तर केवळ बिग बाजारमध्ये नागरिकांनी अन्न-धान्य खरेदी करण्याकरिता हजेरी लावली. त्यामुळे इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आली नसल्याचे दिसून आले.