25 November 2020

News Flash

ठाण्यातील बाजारपेठांत दिवाळीचा दिमाख!

मॉल व्यवस्थापनांकडून आकर्षक रोषणाई

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खरेदीवर विशेष सूट; मॉल व्यवस्थापनांकडून आकर्षक रोषणाई

ठाणे : गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या करोना संसर्गाच्या टाळेबंदीमुळे ओस पडलेल्या ठाण्यातील बाजारपेठांना दिवाळीच्या निमित्ताने रंग चढू लागला आहे. शहरातील जांभळी नाका, राम मारुती रोड, गोखले रोड, रेल्वे स्थानक परिसर या ठिकाणी दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या विविध वस्तू, आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, कपडे तसेच इलक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांनी सणाच्या निमित्ताने खरेदी करावी यासाठी व्यापारी या वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक सूट देत आहेत,

मार्च महिन्याच्या अखेरीपासून करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्याने बाजारपेठा बंद होत्या. या टाळेबंदीमुळे यंदा गुढीपाडवा, अक्षयतृतीया तसेच लग्नसराईच्या मोसमाला व्यापाऱ्यांना पूर्णत: मुकावे लागले होते, तर टाळेबंदीत अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड आल्याने नागरिकांनीही साध्या पद्धतीने सण-उत्सव साजरे करण्यावर भर दिला होता. त्यामुळे ठाणे शहरातील बाजारपेठांमध्ये दरवर्षी या काळात होणारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येऊ लागल्याने बाजारातही उत्साह दिसू लागला आहे. राज्य सरकारने टाळेबंदीत शिथिलता आणली आहे. त्यामुळे व्यापारांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळाला असून दिवाळीच्या निमित्ताने ठाण्यातील जांभळीनाका, राम मारुती रोड, गोखले रोड आणि रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठा सजल्या आहेत. या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या सणासाठी लागणारे उटणे, विविध प्रकारचे आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, फटाके, रेडिमेड कपडे, साडय़ा यांसह भांडी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. सध्या करोनाकाळ असल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने शहरातील व्यापाऱ्यांनी विविध वस्तूंच्या विक्रीवर आकर्षक सूट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये दुकानांच्या बाहेर ५ ते ६० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत असल्याचे फलक झळकू लागले आहेत, तर काही दुकानदार खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देत आहेत.

मॉलमध्ये आकर्षक सजावट, खरेदीवर सोडत योजना

शहरातील कोरम, विवियाना मॉल गेल्या सात महिन्यांपासून बंद होते. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर हे मॉल पुन्हा सुरू झाले असून दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल व्यवस्थापनाने मॉल परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली असल्याचे दिसून येत आहे. विवियाना मॉल परिसरात आकर्षक कंदिलांसह दीपमाळा लावण्यात आल्या आहेत, तर कोरम मॉलवर विविध रंगांच्या विद्युत दिव्यांनी रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही मॉल दिवाळीच्या निमित्ताने विविध रंगांमध्ये उजळून गेले आहेत. या मॉलमध्येही खरेदीसाठी नागरिक आकर्षित व्हावे, या उद्देशाने खरेदीवर कार, इलेक्ट्रिक वस्तू, रोख रक्कम यांसारख्या सोडत योजना लागू केल्या आहेत. त्यामुळे मॉलमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असून प्रवेशापूर्वी नागरिकांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:38 am

Web Title: mall in thane offering attractive discounts to consumers on diwali occasion zws 70
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत रुग्णदुपटीचा वेग २०६ दिवसांवर
2 कोकण विभागात रक्तद्रव दानात ठाणे शहर अव्वल
3 शहरबात : ‘चौथी मुंबई’ प्रदूषणाच्या विळख्यात
Just Now!
X