06 August 2020

News Flash

मल्लेश शेट्टी पुन्हा नगरसेवकपदी

ई.रवींद्रन यांनी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद न्यायालयाच्या आदेशावरून रद्द केले होते.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका (संग्रहित छायाचित्र)

कडोंमपा आयुक्तांना न्यायालयाचा धक्का
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे पद रद्द करण्याच्या आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेट्टी यांचे नगरसेवकपद कायम राहिले असून बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या लोकप्रतिनिधीविरोधात रवींद्रन यांनी सुरू केलेल्या मोहिमेला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही तीन नगरसेवकांचे पद रद्द केले होते. त्यालाही न्यायालयाने स्थगिती दिली होती.
अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत आयुक्त ई.रवींद्रन यांनी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद न्यायालयाच्या आदेशावरून रद्द केले होते. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. नगरसेवकपद रद्द करण्याच्या कारवाईला मल्लेश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या वेळी शेट्टी यांच्या वतीने प्रशासनाला नगरसेवकपद रद्द करण्याचे अधिकार नाहीत, असा युक्तिवाद उच्च न्यायालयात करण्यात आला होता. तसेच शेट्टी यांचे बांधकाम हे खूप जुने आहे. त्यामुळे त्यांचा या बांधकामाशी संबंध नाही, अशी भूमिका शेट्टी यांच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आली. ती ग्राह्य़ धरीत न्यायालयाने पालिकेने रद्द केलेले नगरसेवक नियमबाह्य़ असल्याची भूमिका घेतली. शेट्टी यांच्या वकिलाने पालिकेला पत्र लिहून त्यांना पालिकेच्या सर्व प्रक्रियांमध्ये सामावून घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेतील आणखी दहा नगरसेवकांवर बेकायदा बांधकामप्रकरणी तक्रारी असून त्यांच्यावरही कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर मल्लेश शेट्टी यांच्यावरील कारवाई न्यायालयाने रद्दबादल ठरविल्याने ई. रवींद्रन यापुढे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 5:40 am

Web Title: mallesh shetty again get counselor position
Next Stories
1 स्कायवॉकवरील तिकीट खिडकीला अखेर मुहूर्त
2 शहरबात ठाणे : क्रीडा क्षेत्राची घोर उपेक्षा
3 हत्याकांडाने विरार हादरले!
Just Now!
X