रॅपलिंग, रॉक क्लायबिंग, कमाण्डो ब्रिज यांचा समावेश; दिवाळीनंतर पर्यटकांसाठी खुले

बदलापूर : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज पर्यटनात आता साहसी खेळांचा थरार अनुभवता येणार आहे. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या थितबी येथील केंद्रात दिवाळीनंतर हे खेळ सुरू होत असून पर्यटकांना आता या ठिकाणी रॅपलिंग, रॉक क्लायबिंग, रिव्हर क्रॉसिंग, कमाण्डो ब्रिज या साहसी खेळांचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय लहान मुलांसाठीही खास साहसी खेळांची व्यवस्था या वन पर्यटन केंद्राच्या आवारात करण्यात आली आहे.

मुंबई आणि उपनगरातून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या माळशेज घाट आणि आसपासच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे प्रत्येक पावसाळ्यात येत असतात. या पर्यटनाला चालना देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून येथील थितबी येथे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा नियोजन विभागाने दिलेल्या निधीतून चार वर्षांपूर्वी वन विभागाने थितबी या गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर पर्यटनग्राम वसवले आहे. सभोवती घनदाट जंगल, तिन्ही बाजूला सह्य़ाद्री डोंगररांगा, डोंगरमाथ्यावरून वेगाने वाहणाऱ्या काळू नदीचे नितळ पाणी आणि निरव शांतता यांमुळे अल्पावधीतच हे पर्यटनस्थळ लोकप्रिय झाले. या ठिकाणी पर्यटकांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या केंद्राचे व्यवस्थापन पाहिले जाते.

सुविधा काय?

* या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांना पुरेशा सुरक्षा साधनांसह साहसी खेळांचा आनंद घेता यावा म्हणून खास व्यवस्था करण्यात आली आहे.

* केंद्राच्या आवारात एक उंच मनोरा उभारून त्याच्या तिन्ही बाजूंना रॅपलिंग आणि रॉक क्लायबिंगची व्यवस्था केली आहे.

ल्ल केंद्राच्या बाहेरून असणाऱ्या काळू नदीच्या प्रवाहात कमांडो ब्रिज आणि रिव्हर क्रॉसिंगची सोय करण्यात आली आहे.

* ‘अ‍ॅडव्हेंचर वन झोन’ या संस्थेच्या वतीने या साहसी खेळांचे व्यवस्थापन पाहिले जाणार आहे.

* प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या मदतीने पर्यटकांना या साहसी खेळांचा आनंद घेता येईल. त्यासाठी पुरेशा सुरक्षा साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अल्पावधीतच थितबी वन ग्राम केंद्र पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. या केंद्राला आता साहसी खेळांची जोड देण्यात आली आहे. लवकरच या नव्या सुविधांसह हे पर्यटन केंद्र खुले होईल. 

– तुळशीराम हिरवे, सहाय्यक वन संरक्षक, ठाणे</strong>