ठाणे : घर मालकावर गावठी कट्टय़ातून गोळी झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक केलेला भाडेकरू घरामध्ये बनावट नोटा तयार करत असल्याची बाब तपासात उघड झाली आहे. बनावट नोटांची देवाण-घेवाण करताना धोका झाला तर सुरक्षेकरिता सोबत शस्त्र असावे म्हणून उत्तर प्रदेशातून एक गावठी कट्टा आणि १५ जिवंत काडतुसे खरेदी केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. तो बनावट नोटा केव्हापासून तयार करत होता आणि त्यामध्ये त्याला आणखी कोणी मदत करत होते का, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आशिष शिवकुमार शर्मा (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिवा परिसरात भाडय़ाच्या खोलीत राहात आहे. घोडबंदर येथील कासारवडवली भागात राहणारे संजीवकुमार गुप्ता (३२) यांचे दिवा परिसरात घर असून त्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून आशीष हा भाडय़ाने राहात होता. काही दिवसांपूर्वी त्याने हे घर सोडले आणि तो दुसऱ्या घरात भाडय़ाने राहण्यासाठी गेला होता. घर सोडताना त्याने साफसफाई केली नव्हती. साफसफाई केल्यानंतरच घरासाठी दिलेली अनामत रक्कम परत करणार असल्याचे संजीवकुमार यांनी त्याला सांगितले. या कारणावरून झालेल्या वादातून त्याने त्यांच्यावर गावठी कट्टय़ामधून गोळी झाडली. परंतु या गोळीबारात ते बचावले. त्यानंतर दुसरी गोळी झाडण्याच्या तयारीत असतानाच संजीवकुमार आणि त्यांचा भाऊ संजय या दोघांनी त्याला पकडले होते. या घटनेची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आशीषला अटक केली होती. तसेच त्याच्याकडून गावठी कट्टा आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली होती. अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी दिली. पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी आणि सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आशीष याच्याकडे जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठय़ाबाबत तपास करण्यात आला. त्यामध्ये आशीष हा घरामध्ये बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पुढे आली आणि त्याआधारे त्याच्या घरातून एक लाख नऊ हजार ६५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये दोन हजार, दोनशे, शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. बनावट नोटांची देवाण-घेवाण करताना धोका झाला तर सुरक्षेकरिता सोबत शस्त्र असावे म्हणून उत्तर प्रदेशातून एक गावठी कट्टा आणि १५ जिवंत काडतुसे खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे, अशी माहितीही पासलकर यांनी दिली. त्याच्या घरातून स्कॅनर, प्रिंटर, कैची, पेन असे साहित्य जप्त करण्यात आले असून या साहित्याच्या आधारे तो बनावट नोटा तयार करत होता, असेही त्यांनी सांगितले.