सीटी स्कॅन चाचणी दरम्यान महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वैद्यकीय सहाय्यकला अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय सहाय्यकावर सीटी स्कॅन सुरु असताना महिलेचे फोटा काढल्याचा आरोप आहे. उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आरोपी पेशाने टेक्निशिअन असून तो सीटी स्कॅन मशीन ऑपरेट करतो. हिल लाइन पोलिसांनी ही माहिती दिली. डॉक्टरांनी महिलेला संपूर्ण शरीराची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यामुळे सोमवारी सीटी स्कॅन चाचणीसाठी ती रुग्णालयात गेली होती. महिला मशीनमध्ये असताना आरोपी वैद्यकीय सहाय्यकाने अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा व फोटो काढल्याचा महिलेचा आरोप आहे.

वैद्यकीय सहाय्यकाचे वर्तन न पटल्याने महिलेने थेट पोलिसांशी संपर्क साधला व सोमवारी संध्याकाळी एफआयआर नोंदवला. “महिलेने रुग्णालय प्रशासनाकडे आधीच तक्रार केली आहे. आम्ही मंगळवारी संध्याकाळी आरोपीला अटक केली. २७ डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे” अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तपासणीसाठी त्याचा फोन जप्त केला आहे.