ठाणे : शीळ-डायघर परिसरातील एका तरुणावर चुकीचे उपचार केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या डॉक्टरने मुंब्रा आणि भिवंडीमधील दोन डॉक्टरांकडून दोन ते तीन हजार रुपयांमध्ये बनावट वैद्यकीय पदवी प्रमाणपत्रे विकत घेतल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. या दोघांना शीळ-डायघर पोलिसांनी अटक केली असून त्यांनी अशाप्रकारे मुंब्रा आणि शीळ परिसरात अनेकांना प्रमाणपत्रे विकल्याचे समोर आले आहे. शीळगावातील अंकित पाटील (२४) याचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. डॉ. मोहम्मद दाऊद खान यांच्या दवाखान्यात उपचारादरम्यान अंकितचा मृत्यू झाला होता.  या प्रकरणी शीळ-डायघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सखोल चौकशी सुरु केली होती. याप्रकरणी मोहम्मदला अटक केली होती. मोहम्मद याच्या वैद्यकीय पदव्या बनावट असल्याची बाब तपासात समोर आली. मुंब्य्रातील डॉ. मोहम्मद फरहान मोहम्मद शाहीद शेख (३६) आणि भिवंडीतील डॉ. अब्दुल रेहमान हकिमद्दीन खान (३६) या दोघांकडून दोन ते तीन हजार रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्रे घेतल्याचे स्पष्ट झाले.