29 September 2020

News Flash

सिमकार्डच्या काळय़ा धंद्याचे पितळ उघडे

दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी अटक केली.

| June 13, 2015 12:50 pm

दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून ‘एअरसेल’ या कंपनीचे ३२६ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण याच कंपनीचा कर्मचारी असून दुसरा सिमकार्ड वितरक आहे. अशा प्रकारे बनावट कागदपत्रांनिशी मिळवलेल्या सिमकार्डचा दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांसाठी उपयोग केला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ठाणे पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भाऊसाहेब जोतिराम दुशिंग ऊर्फ राव (३५, रा. नवी मुंबई) आणि अश्विन देवनाथ गुप्ता (२७, रा. सांताक्रूझ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापैकी भाऊसाहेब हा एअरसेल कंपनीचा कर्मचारी आहे तर अश्विन हा सिमकार्ड वितरक असून त्याचे ठाण्यातील सावरकरनगर भागातील घरकुल सोसायटीत कार्यालय आहे. तिथे वेगवेगळ्या दुकानांच्या बनावट रबरी शिक्क्यांचा वापर करून एअरसेल कंपनीच्या सीमकार्डची विक्री करण्यात येते, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकाने बुधवारी कार्यालयावर धाड टाकून या दोघांना अटक केली. या धाडीत एअरसेल कंपनीची ३२६ सीमकार्ड्स तसेच सीमकार्ड नसलेली १७८ रिकामी पाकिटे, वेगवेगळ्या लोकांच्या नावाने भरलेले अर्ज, विविध दुकानांच्या नावांचे बनावट रबरी शिक्के सापडले. याशिवाय, वेगवेगळे नाव व पत्ते असलेले आधारकार्ड, निवडणूक कार्ड, पासपोर्ट आणि पॅनकार्ड आदींच्या सुमारे पाचशेहून अधिक  झेरॉक्स प्रती तसेच ३५० हून अधिक स्त्री व पुरुषांचे फोटो सापडले आहेत. त्यामुळे या दोघांकडे ही कागदपत्रे कुठून आली, याचा तपास पोलीस करीत आहेत.
वास्तव्याचा कोणताही पुरावा नसलेल्या व्यक्तींकडून पैसे घेऊन दुसऱ्याच व्यक्तींच्या कागदपत्रांवर मिळवलेले सिमकार्ड पुरवण्याचा हा काळा धंदा गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. त्यामुळे या दोघांनी विकलेल्या सिमकार्डचा गुन्हेगारी वा घातपाती कारवायांसाठी वापर झाला होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत. ठाणे न्यायालयाने या दोघांना १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 12:50 pm

Web Title: man arrested for selling sim cards on another person documents
Next Stories
1 पालिका शाळांच्या सफाईचे खासगीकरण
2 ‘ग्रंथयान’मुळे वाचकांमध्ये एक हजाराची वाढ
3 ठाण्यात घराचे पत्रे कोसळून तिघे जखमी
Just Now!
X