सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करणाऱ्या एका सफाई कामगाराला ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. या कामगाराने पीडित मुलाला १०० रुपये दिले. त्यानंतर त्याला स्वच्छतागृहात नेऊन त्याचे शोषण केले अशी माहिती पोलिसांनी दिली. संदीप सुरज सिंग असे या २२ वर्षाच्या कामगाराचे नाव आहे. संदीप सुरज सिंगने याआधीही या मुलाचे लैंगिक शोषण केले आहे असेही पोलिसांनी सांगितले.

संदीप वागळे इस्टेट ठाणे याच ठिकाणी राहतो. लैंगिक शोषण केल्यावर त्याने ११ वर्षाच्या मुलाला कोणाकडे काही बोललास तर ठार करेन अशी धमकीही दिली होती. मागील महिन्यात त्याने पुन्हा एकदा या मुलाला सार्वजनिक स्वच्छतागृहात नेले. तिथे त्याने त्याचे लैंगिक शोषण केले. ही बाब काही स्थानिकांनी पाहिली ज्यानंतर त्यांनी संदीप सिंगला मारहाण केली. या मारहाणीनंतर संदीप सिंग तिथून पळून गेला होता. मात्र महिन्याभरात तो पुन्हा आला आणि पुन्हा त्याने याच मुलाचे लैंगिक शोषण केले. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलाने आपल्या घरी लैंगिक शोषणाची व्यथा सांगितली.

पीडित मुलाने हा सगळा प्रकार आपल्या घरी सांगताच त्याच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून संदीप सिंगला अटक केली. संदीप सिंगवर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. तर संदीप सिंगला कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली.