ठाणे : क्षुल्लक कारणावरून शान खान याने पत्नीच्या डोक्यात पोळपाटाने प्रहार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शानला दादर रेल्वे स्थानकातून अटक केली. हत्येच्या वेळी शानचा तीन वर्षीय मुलगाही घरात होता. आईची हत्या झाल्यानंतर दोन तास हा मुलगा आईच्या प्रेताजवळ बसून रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांना हत्येची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

शानचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. रविवारी दुपारी क्षुल्लक कारणावरून पत्नीशी झालेल्या वादातून शानने तिच्या डोक्यात पोळपाटाने प्रहार केला. तिच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. शेजाऱ्यांना मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी दरवाजा उघडला. त्या वेळी हा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या प्रेतावर  झोपलेल्या अवस्थेत दिसला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यामुळे आरोपी हा शानच असावा असा संशय पोलिसांना आला. दरम्यान, शानचा दुसरा फोन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे स्थळ तपासले. त्या वेळी ते दादर रेल्वे स्थानक दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी शानला दादर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. नंतर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली. तीन वर्षीय मुलाला त्याच्या काकाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती चंद्रकांत जाधव यांनी दिली.