भाईंदर : फेसबुकवर अनोळखी महिलेशी मैत्री करणे भाईंदरमधील एका व्यक्तीला महागात पडले. परदेशस्थ महिलेने तक्रारदाराला स्वत:च्या लाडीक बोलण्यात गुंतवून आठ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिसांत फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

उत्तन येथील डोंगरीगाव येथील तक्रारदार रेहान बोर्जीस (वय ४२) हे जहाजावर काम करतात. जून २०२० मध्ये त्यांना फेसबुकवर रोझ स्मित या महिलेने मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. रोझ ही बोर्जीस यांच्याशी दूरध्वनीवरून रोज बोलत होती. याशिवाय व्हॉटसअ‍ॅपव्दारे संदेशांची देवाणघेवाणही केली जात होती. त्यामुळे बोर्जीस यांनी तिच्यावर विश्वास ठेवला.

रोझ हिने बहीण मुंबईला असून तिच्या घराचे भाडे थकले आहे, असे सांगून उसनवारीवर पैशाची मागणी केली. त्यावर बोर्जींस यांनी तिच्या बहिणीच्या खात्यावर पहिल्यांदा साडेसात हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर रोझ हिने बोर्जीस यांना परकीय चलनातील रक्कम भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी आणखी काही रक्कम भरण्याची सूचना केली. त्यानुसार बोर्जीस यांनी २९ जून २०२० ते १३ जुलै २०२० या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांत  आठ लाख २५ हजार रुपये भरले.

त्यानंतर बोर्जीस यांनी रोझ पैसे परत करील या अपेक्षेने काही दिवस वाट पाहिली आणि रोझ हिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तिचा दूरध्वनी बंद असल्याचे बोर्जीस यांच्या निदर्शनास आले.