कल्याण : भिवंडीतील एका शाळेतील विद्यार्थिनींना मोटार व्हॅनमधून शाळेतून ने-आण करताना त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या वाहन चालक तुळशीराम मणेरे (३५) याला ठाणे जिल्हा न्यायालयाचे विशेष अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस. पी. गोंधळेकर यांनी १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि २८ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

अतिरिक्त सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी न्यायालयाला सांगितले, तुळशीराम शालेय विद्यार्थ्यांची नियमित वाहतूक करीत होता. त्याच्या मोटार व्हॅनला काळ्या काचा होत्या. तो दर शनिवारी मुलींना घरी सोडण्यापूर्वी व्हॅन निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. हा प्रकार कोणाला सांगितला तर मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे विद्यार्थिनी घाबरल्या होत्या.

दर शनिवारी तुळशीराम हा प्रकार करीत असल्याने भेदरलेल्या मुली शनिवार शाळेत जात नसत. एक दिवस शाळेच्या शिक्षिकेने या दोन्ही मुलींना शनिवारी शाळेत न येण्याचे कारण विचारल्यावर यापूर्वी घडलेला सगळा प्रकार उघडकीला आला. जानेवारी ते डिसेंबर २०१६ च्या दरम्यान चालक तुळशीरामने या मुलींवर बलात्कार आणि त्यांचा विनयभंग केला.

त्यानंतर तुळशीराम विरुद्ध निजामपुरा पोलीस ठाण्यात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला कठोर शिक्षा सुनावली.