ठाणे जिल्हा मोटार अपघात दावा प्राधिकरणाचे आदेश

डोंबिवली : कल्याण येथील अडवली गावातील एक रहिवाशाने माकडाला वाचविताना झालेल्या अपघातात जखमी झाल्यानंतर  केलेल्या दाव्यात जखमीला पाच लाख ८८ हजार ८९० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश  विमा कंपनीला आणि अपघात करणाऱ्या वाहनमालकास दिले आहेत.

आपण सरकारी नोकर आहोत. दरमहा आपले वेतन ३८ हजार ४४० आहे. अपघातामुळे आपणास घरी राहावे लागले. रजा घ्यावी लागली. त्यामुळे आपणास आजाराची आणि रजा काळातील नुकसानभरपाई देण्याची मागणी कांबळे यांनी  ठाणे जिल्हा मोटार अपघात दावा  प्राधिकरणासमोर केली होती.  सुनावणीच्यावेळी कांबळे यांच्या वाहनाला आपल्या वाहनाने धडक देणारे वाहनमालक रामचंद्र भास्कर शेवटपर्यंत  प्राधिकरणासमोर हजर राहिले नाहीत. प्राधिकरणाचे सदस्य आणि जिल्हा न्यायाधीश एम. एम. वालीमोहम्मद यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे अ‍ॅड. के. व्ही. पुजारी यांनी कांबळे यांच्या चुकीमुळे अपघात झाला आहे. त्यामुळे नुकसानी देण्यास आम्ही बांधील नाही, अशी भूमिका घेऊन दावा फेटाळण्याची मागणी केली होती. प्राधिकरणाचे सदस्य  एम. एम. वालीमोहम्मद यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उल्हास कांबळे यांचा आजारपणातील खर्च आणि नुकसानीची भरपाई म्हणून पाच लाख ८८ हजार रुपये देण्याचे आदेश  वाहन मालक आणि त्यांच्या विमा कंपनीला दिले. ही रक्कम वेळेत दिली नाही तर वार्षिक सात टक्के परताव्याने ही रक्कम द्यावी लागेल असे वालीमोहम्मद यांनी सूचित केले आहे.

तीन वर्षांपूर्वीची घटना

अडवली गावचे रहिवासी उल्हास कांबळे हे सरकारी नोकरीत आहेत. तीन वर्षांपूर्वी ते आपल्या वाहनाने अहमदनगरवरून कल्याणच्या दिशेने येत होते. भोरांडे गावाजवळ कांबळे यांच्या मोटारीसमोर अचानक एका माकडाने उडी मारली. कांबळे यांनी तात्काळ माकडाचा जीव वाचविण्यासाठी मोटार बाजूला घेतली. त्याच वेळी समोरून वेगाने येत असलेली जुन्नर येथील रहिवासी रामचंद्र भास्कर यांचे वाहन कांबळे यांच्या वाहनाला जोराने धडकले. या अपघातात कांबळे गंभीर जखमी झाले. कांबळे यांनी या अपघातप्रकरणी नुकसानभरपाई मिळण्यासाठी ठाणे जिल्हा मोटार अपघात दावा प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता.