स्मार्टफोन्सच्या दुनियेत आयफोन वापरणे हे स्टेटस सिम्बॉल मानले जाते. वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन आणि फिचर्स यामुळे आयफोन कायमच ग्राहकांच्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे. अॅपलकडून नुकतेच आयफोन ८ आणि आयफोन X या दोन नवीन स्मार्टफोन्सचे अनावरण करण्यात आले. हे दोन्ही फोन भारतीय बाजारपेठेत दाखलही झाले. मात्र, या दोन्ही फोन्सची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आयफोन ८ किंवा आयफोन X विकत घेणाऱ्या वर्गाबद्दल अप्रूप वाटणे साहजिक आहे. ठाण्यात आयफोन X विकत घेण्यासाठी दुकानात गेलेल्या तरूणाचा थाट पाहता हे विधान वावगे वाटणार नाही. हा तरूण आयफोन विकत घेण्यासाठी दुकानापर्यंत चक्क घोड्यावर बसून गेला. यावेळी त्याच्या मागे बँडबाजा आणि वरातही पाहायला मिळाली. साहजिकच त्याचा हा थाट प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर वापराताय? मग हे वाचा

महेश पालीवाल हा २० वर्षांचा तरुण ठाण्यातील गोकुळनगर परिसरात राहतो. महेशला आयफोनचं प्रचंड वेड आहे. त्यामुळे नव्याने लाँच झालेलं आयफोन एक्स हे लेटेस्ट मॉडेल विकत घ्यायला जाताना तो घोड्यावर बसून गेला. शुक्रवारी संध्याकाळी ढोल ताशा घेऊन आणि घोड्यावर स्वार होऊन त्याने नौपाड्यातील एका दुकानातून हा फोन खरेदी केला. महेश जेव्हा स्वतः कमवत नव्हता तेव्हा त्याचे आईवडील त्याला आयफोन घेऊन देत होते. आता महेश स्वतः कमवायला लागल्याने त्याने स्वतःच्या पैशाने एक लाख दोन हजाराचा हा फोन घेतला आहे.

‘डबललॉकर’चे संकट

सप्टेंबर महिन्यात अॅपलने आयफोन X लाँच केला होता. ५.८ इंचांच्या बेझललेस डिस्प्लेमुळे आयफोन एक्सला अतिशय शानदार लूक मिळाला. या फोनच्या स्क्रीनचे रिझोल्युशन ११२५ x २४३६ पिक्सल इतके आहे. याआधी आयफोनच्या कोणत्याही मॉडेलमध्ये अशा प्रकारचा डिस्प्ले देण्यात आलेला नाही. याशिवाय आयफोनची ओळख असणारे होम बटणदेखील या फोनला देण्यात आलेले नाही. दहा वर्षांमध्ये प्रथमच होम बटण नसलेला हा फोन आहे. आयफोन एक्समध्ये १२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एका कॅमेऱ्याला एफ / १.८ अॅपर्चर देण्यात आला असून, दुसऱ्या कॅमेऱ्यात टेलिफोटो लेन्स असेल. एफ/२.४ अॅपर्चर हे या लेन्सचे वैशिष्ट्य असेल. या फोनचा सेल्फी कॅमेरा ७ मेगापिक्सलचा आहे. फेस आईडी फीचरमुळे हा फोन सगळ्यात हटके ठरला. या फीचरमुळे चेहऱ्याचा पासवर्डसारखा वापर करून युजरना फोन अनलॉक करता येणार आहे. या फोनच्या ६४ जीबीच्या मॉडेलची किंमत ८९ हजार रुपये आहे. तर २५६ जीबीच्या मॉडेलसाठी १ लाख २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या सिल्व्हर आणि स्पेस ग्रे अशा दोन रंगात हा फोन भारतात उपलब्ध असेल. अमेरिकेच्या तुलनेत भारतात आयफोन हा ३९ पटींनी महाग आहे.