दारू व कोरेक्सचे व्यसन सोडण्याचा वारंवार सल्ला देणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या प्रवीण भंडारी (३५) याच्यासह त्याचा साथीदार रशिद पावले याला ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, त्याचा तिसरा साथीदार धर्मराज जोशी हा जामिनावर सुटल्यानंतर फरार असल्यामुळे त्याची सुनावणी प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
भिवंडी येथील गोकुळनगर भागात प्रवीण भंडारी रहायचा आणि याच परिसरात त्याचे किराणा मालाचे दुकान होते. मात्र त्याचे व्यसन पत्नी चंद्रा हिला आवड नव्हते. यामुळे ती त्याला वारंवार ही व्यसने सोडण्याचा सल्ला देत होती. यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. यातूनच प्रवीणने तिच्या खुनाचा कट रचला. यासाठी त्याने रशीद पावले आणि धर्मराज जोशी या दोघांना सुपारी दिली होती. त्यानुसार या दोघांनी घरामध्ये शिरून चंद्राचा खून केला. तसेच चोरीच्या उद्देशातून खून झाल्याचे भासविण्यासाठी घरातील मौल्यवान वस्तू चोरल्या. त्यानंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात प्रवीणने खोटी तक्रार दिली. परंतु, तपासामध्ये प्रवीण यानेच खून केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्या साथीदारांनाही अटक केली होती.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुनील कोतवाल यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील संगीता फड यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. न्यायालयामध्ये एकूण ३४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये भिवंडीतील विविध दुकानदारांचा समावेश होता. त्यांच्याकडून रशीदने विविध दुकानांमधून हातोडी, स्क्रू ड्रायव्हर तसेच वेशांतर करण्यासाठी गॉगल, टोपी आणि टी-शर्ट खरेदी केले होते. न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले सर्व साक्षीपुरावे ग्राह्य मानून न्यायाधीशांनी प्रवीण आणि रशीदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.