काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रा-वन या सिनेमातील ‘छम्मकछल्लो’ हे गाणे चांगलेच गाजले होते. करीना कपूरवर चित्रित झालेले हे गाणे आजही लोकांच्या तोंडी आहे. मात्र एखाद्या महिलेला जर छम्मकछल्लो असे म्हणाल तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल, हे लक्षात ठेवा.

ठाण्यात एका महिलेला छम्मकछल्लो असे म्हणणे एका माणसाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात न्यायदंडाधिकारी आर. टी इंगळे यांनी आरोपीला एक रूपयांचा दंड आणि कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
जानेवारी २००९ मध्ये ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात राहणारी एक महिला सकाळी आपल्या पतीसह मॉर्निंग वॉकवरून घरी परतली. इमारतीत गेल्यावर स्वतःच्या फ्लॅटमध्ये जात असताना तिचा धक्का लागल्याने शेजारी राहणाऱ्या माणसाच्या घराबाहेर असलेला कचऱ्याचा डबा पडला आणि त्यातील कचरा खाली सांडला. या महिलेने जाणीवपूर्वक कचऱ्याच्या डब्याला धक्का मारला असे वाटल्याने तो माणूस तिच्यावर ओरडला आणि त्याने बाचाबाची दरम्यान त्या महिलेला ‘छम्मकछल्लो’ असे म्हणत शेरेबाजी केली.

शेजाऱ्याने अशा प्रकारे शेरेबाजी केल्याने संतापलेली महिला तिच्या हाऊसिंग सोसायटीच्या कार्यालयात गेली आणि तिने तिच्या शेजाऱ्याची तक्रार केली. मात्र हाऊसिंग सोसायटीने याची दखल न घेतल्याने महिलेने पोलीस ठाणे गाठले. ‘छम्मकछल्लो’ म्हटल्याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. शेवटी या महिलेने न्यायालयाचे दार ठोठावले.

न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांनी या सगळ्या प्रकरणावर आठ वर्षांनी निकाल दिला आहे. छम्मकछल्लो हा हिंदी शब्द आहे, इंग्रजी भाषेत अशा अर्थाचा कोणताही शब्द नाही. भारतीय समाजात एखाद्या महिलेचा अपमान करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. या शब्दामुळे महिलांना चीड येते, सकारात्मक पद्धतीने या शब्दाचा वापर समाजात केला जात नाही, असे निकालात म्हणत भारतीय दंड विधान कलम ५०९ अंतर्गत (शब्द, इशारे आणि वर्तणुकीमुळे महिलेचा अपमान ) महिलेच्या शेजाऱ्याने गुन्हा केल्याचे नमूद केले. कोर्टाने याप्रकरणी आरोपीला एक रूपयाचा दंड आणि कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कारवास अशी शिक्षा सुनावली आहे.