गंमत म्हणून स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून पोलिसांना कामाला लावणारा भामटा अखेर गजाआड झाला आहे. शिवकुमार गौतम (३६) असे आरोपीचे नाव आहे. शिवकुमारने तीन जानेवारीला रात्री ९.१५ च्या सुमारास त्याच्या मोबाईलवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधव यांना फोन लावला व वसई पूर्वेल असणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तृंगारेश्वर फाटा येथून काही जणांनी आपले अपहरण केले आहे असे सांगितले.

गौतमने जेव्हा विनोद जाधव यांना फोन केला तेव्हा आपण खूप घाबरलो आहोत असे त्याने दाखवले. काही जणांनी आपले अपहरण केले असून ते अज्ञात स्थळी घेऊन जात आहेत असे त्याने सांगितले. त्याने त्याच्या मोबाईलवरुन हा फोन केला. त्यानंतर फोन स्विचऑफ झाला. चार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलचा फौजफाटा तृंगारेश्वर फाटा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी शोध मोहिम सुरु केली पण शिवकुमार गौतमचा काही पत्ता लागला नाही.

पोलिसांनी स्विच ऑफ झालेल्या गौतमच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. दुकानदार आणि स्थानिकांची चौकशी केली पण त्यातून गौतमच्या बेपत्ता होण्याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी गौतमच्या घरचा पत्ता शोधून त्याच्या कुटुंबियांशी बोलण्याचा निर्णय घेतला.

चार जानेवारीला पहाटेच्या सुमारास जेव्हा पोलीस पथक वसई फाटा येथील गौतमच्या घरी पोहोचले तेव्हा समोर गौतमला पाहून त्यांना धक्का बसला. गौतम आरामात झोपला होता. पोलिसांना दरवाजात पाहून गौतमला धक्का बसला. आपण गंमत म्हणून फोन केला होता. माझा फोन कॉल गांभीर्याने घ्याल असे वाटले नव्हते असे त्यांना पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चुकीची माहिती दिल्या प्रकरणी कलम १८२ अंतर्गत गौतमला अटक केली.