चोरवाटा उघडल्यामुळे गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना
रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद केलेल्या बदलापूर स्थानकातील चोरवाटा अज्ञातांनी पुन्हा उघडल्याने प्रवाशांनी पुन्हा रूळ ओलांडायला सुरुवात केली असून याच वाटांचा वापर करत मार्ग ओलांडताना एकाच बळी गेला आहे.
बदलापूर स्थानकातील चोरवाटा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी बंद केल्या होत्या. लोकसत्ताने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या वृत्ताची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. वाटा बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांना रूळ ओलांडण्याचे टाळून स्कायवॉक आणि पादचारी पुलाचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र काही अज्ञातांनी गेल्या महिन्यात रेल्वेने बंद केलेल्या या चोरवाटा पुन्हा उघडल्या. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या पादचारी पुलांना टाळून रेल्वे प्रवासी या उघडय़ा झालेल्या चोरवाटांचा वापर करू लागले. अशाच प्रकारे रूळ ओलांडताना सोमवारी सकाळी डेक्कन एक्सप्रेसखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला आहे. विशाल मथुरे (४२२ असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते सकाळी लोकल पकडण्याच्या गडबडीत असताना रूळ ओलांडत होते. २ एप्रिल रोजीही अशाच प्रकारे महिलेचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला होता.
दरम्यान, भाजपच्या एका नगरसेवकाने रिक्षाचालकांचा बेकायदा थांबा चालविण्यासाठी पश्चिमेकडील वाट मोकळी करून दिल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे येथील दुकाने, भाजीपाला विक्रेते आणि रिक्षाचालकांना थेट फायदा होत असल्याचे बालले जाते आहे.

रेल्वे प्रशासनही जबाबदार
बदलापूर शहराची लोकसंख्या सातत्याने वाढते आहे. त्याचा भार रेल्वे सेवेवरही पडतो आहे. परिणामी रेल्वे स्थानकात मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहावयास मिळते. फलाट R मांक एक आणि दोन आधीच अरुंद आहेत. त्यात या फलाटांवर मुंबईकडे आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबतात. त्यामुळे या फलाटांवर मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. या फलाटांवरील पादचारी पूलही छोटा असल्याने खूप वेळ प्रवाशांना रांगेत उभे राहून पूल चढावा लागतो. त्यामुळे अनेकदा प्रवासी रूळांवरून उडय़ा मारून जात असतात. रेल्वे प्रशासनाकडून या फलाटावर आणखी एक पादचारी पुलाची गरज असताना तो पूर्ण होत नाही. त्यामुळे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांप्रमाणे रेल्वे प्रशासनही अशा घटनांना जबाबदार असल्याचे सुज्ञ नागरिक व्यक्त करतात.

स्वयंचलित जिन्याची गरज
स्वयंचलित जिन्याची गरज मुळात फलाट R मांक एक आणि दोनवर असताना तो फलाट R मांक तीनवर बसविण्याचे काम सुरू आहे. गर्दीची फलाटे एक आणि दोन आहेत. मात्र त्यावर पादचारी पुलासाठी कोणतीही तजवीज का केलेली नाही. बदलापूर स्थानकातील फलाट R मांक एक आणि दोनवरील गर्दीचे नियंत्रण करायचे असल्यास होम प्लॅटफॉर्म हा एकच पर्याय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोनही फलाटावरील ताण कमी होणार आहे.