घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केल्याच्या कारणावरून मुलीकडच्या कुटुंबीयानी तरुणाची हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. येथील कॅम्प पाचमधील फॉलोवर लाइन परिसरात राहणारा पंकज गौहेर (२६) याचे पूजा सौदे हिच्यासोबत प्रेम होते. त्या दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून काही दिवसांपूर्वीच कोर्ट मॅरेज केले होते. पंकजची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. तसेच त्याला सरकारी नोकरी नसल्याचा राग पूजा हिच्या घरच्यांना होता. याच रागाच्या भरात मंगळवारी रात्री धन्नु, लोकेश, अरुण, महेश, शाम व त्यांचे इतर तीन चार साथीदार पंकजच्या घरात घुसले. त्यांनी चॉपर व तलवारीने पंकजवर वार केले. त्याला वाचविण्यासाठी पंकजचा भाऊ सूरज व त्याचे वडील पुढे आले असता, त्यांच्याही डोक्यावर तलवारीने वार केले. तसेच पूजालाही त्यांनी लाथाबुक्क्य़ांनी मारहाण केली. या हल्ल्यात पंकजचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सूरज याने दिलेल्या तक्रारीनुसार धन्नु, लोकेश, महेश, अरुण, शाम व त्याचे साथीदार यांच्यावर हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.