फेसबुकवर पत्नी, मुलींची हत्या करण्याची धमकी

‘पत्नी आणि दोन मुलींची हत्या करणार आहे,’ असा संदेश एका माथेफिरूने पोलिसांच्या फेसबुक मेसेंजरवर टाकला. हा संदेश पालघर पोलिसांनी गांभीर्याने घेतला आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली. काही तासाच्या आत पोलीस या व्यक्तीपर्यंत पोहोचले आणि त्याला हत्या करण्यापासून परावृत्त केले. पत्नी आणि मुली आपल्याला चांगली वागणूक देत नसल्याने हे कृत्य करणार होतो, असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.

पालघर पोलिसांनी जनतेशी सुसंवाद साधण्यासाठी समाज माध्यमांचा वापर सुरू केला आहे. पोलिसांनी फेसबुक पेज आणि ट्विटर खाते सुरू केले असून त्याद्वारे जनतेच्या अडचणी सोडवल्या जातात. शनिवारी संध्याकाळी पालघर पोलिसांच्या फेसबुक मेसेंजरवर आलेल्या एका संदेशाने पोलिसांची झोप उडवली. ‘मी आता माझ्या पत्नी आणि दोन्ही मुलींची हत्या करणार आहे,’ अशा आशयाचा संदेश एका व्यक्तीने पाठवला होता. हा संदेश पोस्ट केल्याच्या १४ व्या मिनिटानंतर पालघर पोलिसांनी हा संदेश पाहिला. या व्यक्तीने स्वत:चे नाव पोलिसांना सांगितले होते, मात्र तो कुठे राहतो याबाबत काहीच माहिती नव्हती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फेसबुक पेज बघणाऱ्या अधिकाऱ्याने पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी या व्यक्तीशी फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संवाद सुरू ठेवला आणि त्याचा मोबाइल क्रमांक मिळवला. मात्र तो चुकीचा होता. या प्रकाराकडे दुर्लक्ष केले तर कदाचित गंभीर घटना घडू शकली असती. त्यामुळे पोलिसांनी हिंमत न हारता त्याच्याशी प्रेमाने संवाद सुरू ठेवला आणि त्याचा खरा मोबाइल क्रमांक मिळवला. त्या मोबाइल क्रमांकाचे टॉवर लोकेशन काढले असता तो क्रमांक नालासोपारा येथील असल्याचे आढळले. पोलीस अधीक्षक सिंगे यांनी त्वरीत नालासोपारा पोलिसांना सतर्क केले आणि त्या व्यक्तीला शोधून काढले. त्याला पोलीस ठाण्यात आणले, तसेच त्याच्या पत्नी आणि दोन्ही मुलींनाही बोलावून घेतले.

ही व्यक्ती शासकीय नोकरीतून निवृत्त झाली आहे. पत्नी आणि दोन्ही मुली चांगली वागणूक देत नाही, असा आरोप त्याने केला आहे. घरात हिन वागणूक मिळत असल्याने तो इतका वैफल्यग्रस्त झाला होता की त्याने पत्नी आणि दोन्ही मुलींना संपवण्याचा निर्णय घेतला होता. तशी तयारीही त्याने केली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने आणि प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले आणि या विचारांपासून त्याला रोखले आहे, तसेच त्याच्या पत्नी आणि मुलींनाही समज देण्यात आली.

आम्ही जनतेत सुसंवाद साधत असतो. हा संदेश दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता म्हणून लगेच आम्ही कामाला लागलो. आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला बोलते केल्याने त्यांचा ठावठिकाणा काढता आला. तिघांचे जीव वाचवण्यात यश आले ही आमच्यादृष्टीने मोठी गोष्ट आहे.

मंजुनाथ सिंगे, पोलीस अधीक्षक, पालघर