16 January 2021

News Flash

‘उंची’च्या नियमाला मंडळांचा हरताळ

सूचना देऊनही सार्वजनिक मंडळांनी मोठय़ा मूर्ती आणल्याने पोलीस आणि पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.

वसईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी सात फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती आणल्या आहेत.

गणेशमूर्तीना सात फुटांची मर्यादा असावी या महापालिकेच्या आदेशाकडे अनेक सार्वजनिक मंडळांनी दुर्लक्ष केले आहे. अनेक मंडळांनी दहा फुटांपासून २५ फुटांपर्यंतच्या मूर्ती आणल्या आहेत. ज्या मूर्ती ७ फुटांपेक्षा उंच आहेत, त्यांना तलावांत विसर्जन करू देणार नाही, असा निर्णय पोलिसांनी घेतला आहे

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठय़ा मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. इतर मंडळांपेक्षा आपल्या मंडळाची मूर्ती मोठी असावी या स्पर्धेमुळे सर्वत्र उंच गणेशमूर्ती पाहायला मिळतात. मात्र या उंच गणेशमूर्तीमुळे विसर्जन मिरवणुकीच्या वेळी वाहतूक कोंडी निर्माण होते. विसर्जनाला अडचणी निर्माण होतात आणि जलप्रदूषण होते ते वेगळे. या समस्या टाळण्यासाठी छोटय़ा गणेशमूर्तीची संकल्पना पुढे आली होती. मागच्या वर्षीच महापालिकेने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना पुढील वर्षी छोटय़ा गणेशमूर्ती आणण्याचे आवाहन केले होते. यंदा पालिकेने ७ फुटांपेक्षा मोठी मूर्ती आणू नये अथवा विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ  देणार नाही, अशा सूचना केल्या होत्या. त्यासाठी पालिका आणि पोलिसांनी सर्व मंडळांच्या बैठकाही घेतल्या होत्या. परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेक मंडळांनी सात फुटांपेक्षा मोठय़ा मूर्ती आणल्या आहेत.

सूचना देऊनही सार्वजनिक मंडळांनी मोठय़ा मूर्ती आणल्याने पोलीस आणि पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. ज्या मंडळांच्या मूर्ती मोठय़ा आहेत, त्यांना विसर्जन करू देणार नाही, असे वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले. अनेक मंडळांनी असा नियम नाही, असे सांगत वाद घातला होता. मात्र मोठय़ा मूर्तीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही त्यांना विसर्जन करू देणार नाही, असे विजयकांत सागर यांनी सांगितले.

गेल्या वर्षीही पालिकेने गणेशमूर्तीच्या उंचीचा नियम केला होता. मंडळांनी लहान मूर्ती आणावी यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत. मात्र मंडळांनी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. आता पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील.

-सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त

लहान मूर्ती ठेवावी, असे महापालिकेने सांगितले होते. मात्र ही संकल्पना मंडळातील कुणालाच पटत नाही. लोकभावना महत्त्वाच्या असतात. त्यामुळे यंदा आम्ही १० फुटांची मूर्ती आणली आहे. या मूर्तीचे आम्ही समुद्रात विसर्जन करणार आहोत.

-राजेश मातोंडकर, अध्यक्ष, साईनगर गणेशोत्सव मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 2:52 am

Web Title: mandal ignored of ganesh idol to be seven feet limit
Next Stories
1 बेशिस्त रिक्षाचालकांमुळे विरारमध्ये वाहतूक कोंडी
2 वसईतील गणेशोत्सव मंडळे अग्निसुरक्षेबाबत उदासीन
3 पारशी कुटुंबीयांकडून  श्री गणेशाची प्रतिष्ठापना
Just Now!
X