News Flash

सार्वजनिक गणेशोत्सवही आता दीड दिवसाचा

ठाणे जिल्ह्य़ातील २० ते २५ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा निर्णय

ठाणे जिल्ह्य़ातील २० ते २५ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा निर्णय

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याची झळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही बसली आहे. यावर्षी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील प्रतिबंधित क्षेत्रांतील सुमारे २० ते २५ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी दीड दिवसाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडपात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे.

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये करोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. राज्य सरकारने मुंबई परिसरातील गणेशोत्सव मंडळांसाठी यापूर्वीच काही सूचना जाहीर केल्या आहेत. गणेशमूर्तीची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित असावी. तसेच ऑनलाइन दर्शनाची सोय करावी, गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, अशा विविध सूचनांचा यामध्ये सामावेश आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्य़ातील मंडळांनीही सरकारच्या या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात सुमारे २ हजार ५०० नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यात १ हजार ५०० मंडळे ठाणे महापालिका क्षेत्रात येतात. यातील ७० ते ८० टक्के गणेश मंडळे ११ दिवस गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यंदा करोनाचा संसर्ग ठाणे जिल्ह्य़ात वाढत असल्याने भाविकांची गर्दी होऊन संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात २० ते २५ टक्के गणेशोत्सव मंडळांनी उत्सव दीड दिवसांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. जी गणेशोत्सव मंडळे १० दिवस गणपती साजरा करणार आहेत, ती मंडळे परिसरातील भाविकांसाठी फेसबुक किंवा विविध समाजमाध्यमांद्वारे गणपतीची ऑनलाइन आरती आणि दर्शन उपलब्ध करणार आहेत. यामुळे गर्दी टाळता येईल, असा दावा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील २० ते २५ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत. या निर्णयाचे सर्वचजण स्वागत करत आहेत. यावर्षीचा गणेशोत्सव सर्व मंडळे साधेपणानेच साजरा करतील.

– समीर सावंत, अध्यक्ष, ठाणे जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 2:07 am

Web Title: mandals to celebrate one and a half days ganesh utsav festival zws 70
टॅग : Ganeshotsav,Ganeshutsav
Next Stories
1 शास्त्रीनगर रुग्णालयासमोर तडफडून रुग्णाचा मृत्यू
2 कल्याणमध्ये ‘धारावी पॅटर्न’
3 बांबूच्या राख्यांपासून आदिवासी महिलांना रोजगार
Just Now!
X