मंगेश्री सृष्टी सोसायटी, वायलेनगर, कल्याण (प.)

कल्याण पश्चिम विभागातील वायलेनगर परिसरातील मंगेश्री सृष्टी सोसायटीच्या परिसरात प्रवेश करताच उंच, डेरेदार आम्रवृक्ष तुमचे स्वागत करतो. उन्हाळ्यात या झाडाला आलेला मोहोराचा सुगंध परिसरात दरवळत राहतो..

कल्याण पश्चिम विभागात रेल्वे स्थानकापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वायलेनगर आहे. या परिसरात मुंबई विद्यापीठाच्या केंद्राचे काम सुरूअसून त्याच्या मागच्या बाजूला मंगेश्री सृष्टी सोसायटी आहे. फेज एकमध्ये सोसायटीच्या चार इमारती असून शंभर सदनिका आहेत. २००७ मध्ये या संकुलाचे बांधकाम सुरू झाले. २००९ पासून येथे नागरिक राहायला आले. त्या वेळी खडकपाडा, वायलेनगर हा परिसर कात टाकत होता. नवीन कल्याण म्हणून हा परिसर ओळखला जातो. रेल्वे स्थानकापासून दूरवर असले तरी येथील वस्ती नियोजित आणि सुटसुटीत आहे. सोसायटीमध्ये सर्व जातीधर्माचे लोक राहतात. मात्र महाराष्ट्रीयांची बहुसंख्या आहे. संकुलातील रहिवासी सर्व सण आणि उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे करतात. दहा दिवसांचा गणेशोत्सव, नवरात्र, होळी, रंगपंचमी, दिवाळी असे सर्व सण येथे साजरे केले जातात. या सणांच्या दिवशी मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा भरविल्या जातात. सर्वासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवले जातात, असे सोसायटीचे माजी अध्यक्ष शरद उपसे सांगतात. सणासुदीला रहिवासी व सोसायटीतील सर्व मुले मिळून परिसराची स्वच्छता करतात. सुट्टीच्या दिवशी येथील झाडांची निगा कशी राखायची, त्यांना खतपाणी कसे घालायचे याविषयी मुलांना सांगितले जाते. प्रत्येक रविवारी येथील मुलेच परिसरातील झाडांची निगा राखण्याचे काम करतात. एरवी त्यांची निगा राखण्यासाठी सोसायटीने एक माळी ठेवला आहे. सोसायटीच्या आवारात नारळ, पाम, बदाम, आंबा, सोनचाफा, जास्वंद यांसह शोभेची काही झाडे लावली आहेत. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आंब्याचे व बदामाचे झाड लावले असून त्याला छान पार करण्यात आला आहे. या पाराच्या दगडांना विविध रंगांनी रंगविण्यात आले असून त्याला एक वेगळा लुक देण्याचे कामही सोसायटीतील नागरिकांनी केले असल्याचे उपसे सांगतात.

उद्यान, परिवहन सेवेचा अभाव

सोसायटीचा परिसर रहिवाशांनी सुशोभित केला आहे. सावली देणारी झाडे तसेच फुलझाडे लावल्याने येथील वातावरण प्रसन्न वाटते. मात्र या झाडांच्या पारांवर महाविद्यालयातील प्रेमी युगुल येऊन बसतात. त्यांच्या चाळ्यांमुळे रहिवाशी हैराण आहेत. त्यांना येथून हटविण्याचा प्रयत्न केला तरी ते रहिवाशांशी उद्धट वर्तन करतात. परिसर शांत असल्याने सोनसाखळी चोरांचाही परिसरात सुळसुळाट असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

परिसरात खासगी शाळा आणि दवाखाने आहेत. मुलांना खेळण्यासाठी सोसायटीच्या आवारात मोकळी जागा आहे. सोसायटीचा एक लहानसा बगिचा असून तिथे लहान मुले सकाळ- संध्याकाळी खेळतात. मात्र परिसरात मोठी बाग नाही. उद्यानासाठी जागेचा काही वाद असून अद्याप एकही उद्यान या परिसरात झालेले नाही. महापालिकेच्या परिवहनची बस सुविधा या परिसरात नाही. सोसायटीला वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. शिवाय ओपन पार्किंगसाठीही जागा भरपूर असल्याने तसा वाहने उभी करण्याचा प्रश्न सतावत नाही. मात्र वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वायलेनगर बस थांबा आहे. मात्र तो या भागापासून खूप दूर आहे. बसव्यतिरिक्त रहिवाशांना वाहतुकीसाठी केवळ रिक्षांचा पर्याय उपलब्ध आहे. रिक्षा थांबाही सोसायटीच्या परिसरापासून लांब आहे. पंधरा ते वीस मिनिटे पायी चालल्यानंतर रिक्षा किंवा बस थांबा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी केवळ येथे रिक्षा उपलब्ध असतात. दुपारच्या वेळी परिसरात रिक्षा मिळणे फार कठीण असते. स्वतंत्र रिक्षा करायची तर रिक्षा चालक ७० ते ८० रुपये भाडे आकारतात. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला हे भाडे परवडत नाही.

ओपन जिम, सी.सी.टी.व्ही.

नुकतीच वायलेनगर येथील पदपथावर महापालिकेच्या वतीने ओपन जिम सुरू करण्यात आली आहे. तसेच सोसायटीच्या आवारातही पालिकेने ओपन जिम बसविली आहे. त्याचा लाभ रहिवासी घेत आहेत. सकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारल्यानंतर अनेक नागरिक येथे व्यायाम करण्यासाठी येतात.

सुरक्षिततेच्या दृष्टीने सोसायटीच्या आवारात, प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच सौरऊर्जेचा उपयोग करता यावा म्हणून सोलर वॉटरची सिस्टमही उपलब्ध आहे. पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरावे तसेच या पाण्याची साठवण करता यावी म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करण्यात आली आहे.