21 January 2019

News Flash

वृक्षलागवडीसोबत खारफुटीचेही रोपण

ठाणे परिसरात यंदा ५५ लाख वृक्षांची लागवड

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| किन्नरी जाधव

खाडीकिनारी १० लाख खारफुटींचे रोपण; ठाणे परिसरात यंदा ५५ लाख वृक्षांची लागवड

राज्य सरकारने आखलेल्या १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे वनवृत्तात ५५ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट आखणाऱ्या वन विभागाने यंदा प्रथमच या मोहिमेत ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या शहरांच्या खाडीकिनारी तब्बल १० लाख खारफुटींचे रोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्य़ाला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला असून हजारो एकर क्षेत्रफळात तिवरांची जंगले पसरली आहे. असे असले तरी नजीकच्या काळात खारफुटींच्या कत्तलीचे प्रमाणही तितकेचे मोठे आहे. हे लक्षात आल्याने यंदा वन विभागाने प्रथमच या आघाडीवर काम करण्याचे ठरविले असून खारफुटींचे रोपण कुठे करायचे यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.

वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येते. वनमहोत्सवाच्या अंतर्गत राज्यभरात हा उपक्रम शासन विभाग, संस्था आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून राबवण्यात येतो. गेल्या वर्षी ठाणे वनविभागाला वनक्षेत्रात पावसाळ्यातील वृक्ष लागवडीसाठी १५ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. यंदा ठाणे वनवृत्तात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी तब्बल ५५ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे ठाणे वनविभागातर्फे सांगण्यात येत आहे.

हे करत असताना यंदा या मोहिमेत खारफुटीचे रोपण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्हा तसेच मुंबई महानगर क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे आखली जात आहेत. रस्ते, पूल यांसारख्या कामांसाठी खारफुटीची मोठी कत्तल होत असून भूमाफियांचे उद्योगही नेहमीप्रमाणे सुरू आहेत. शासकीय प्रकल्पांची आखणी करताना खारफुटी कापली गेल्यास त्याच्या पुनरेपणाचे ठोस असे नियम असले तरी यंदाच्या वृक्ष लागवड मोहिमेत प्रथमच खारफुटीचे रोपणाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे प्रादेशिक वनविभागात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. यात ठाणे जिल्ह्य़ात ठाणे, शहापूर, पालघर जिल्ह्यात डहाणू, जव्हार आणि रायगड जिल्ह्य़ात अलिबाग, रोहा या ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यानुसार ठाणे जिल्ह्य़ात २० लाख ५० हजार, पालघर जिल्ह्य़ात २० लाख ५ हजार तसेच रायगड जिल्ह्य़ात १४ लाख एवढी वृक्ष लागवड होणार असल्याचे वनविभागाचे नियोजन आहे. तसेच या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्य़ात ३७ लाख ६४ हजार ४१८ खड्डे खणण्याचे काम पूर्ण झाले असून वनविभागाच्या रोपवाटिकेत १४३ लाख २२ हजार एवढी अतिरिक्त रोपांची संख्या आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वन विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ग्रीन आर्मी’ या उपक्रमाचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी होणार आहे. या उपक्रमामध्ये नाव नोंदणी केलेल्या नागरिकांना यंदाच्या वृक्ष लागवडीसाठी स्वयंसेवकांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पर्यावरण संस्था, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठय़ा स्तरावर वृक्षलागवड होणार आहे. वृक्ष लागवडीत स्थानिक प्रजातीची रोपे लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या वृक्षलागवडीत सहभागी व्हावे.    – सचिन रेपाळ, विभागीय वनअधिकारी, (नियोजन), प्रादेशिक वनविभाग ठाणे

First Published on May 12, 2018 12:42 am

Web Title: mangrove plantation in thane