News Flash

कांदळवनावर कुऱ्हाड

गेल्या एक ते दीड महिन्यापासून तिवरांवर मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे.

नायगाव खाडीजवळील तिवरांचा पट्टा मातीच्या भरावाने नष्ट; पोलिसांकडून गुन्हा दाखल

तिवरांची कत्तल होण्याचे प्रकरण वसई-विरारमध्ये नवीन नाही. मात्र नायगावमध्ये मातीचा भराव टाकून तिवरांचा पट्टाचा नष्ट करण्यात आला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तिवरांवर कुऱ्हाड चालवली जात असताना प्रशासनाचे मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. मोठा पट्टा नष्ट झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि तहसीलदारांनी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तिवर क्षेत्रापासून किमान ५० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण, न्यायालयाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत नायगाव परिसरात मोठया प्रमाणात तिवरांची कत्तल करून अनिधकृत बांधकामे केली जात आहे. नायगाव पश्चिमेकडे पुलाच्या शेजारी सव्‍‌र्हे क्रमांक  ६० वर तिवरांच्या झाडांची कत्तल करून तिथे मातीचा भराव टाकण्यात आला आहे. परिसरातील उड्डाणपुलावरून पाहिले असता तिवरांचा एक पट्टाच नष्ट झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. खासगी फायद्यासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तिवरांचा नाश करण्यात आला आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून तिवरांवर मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. रात्रीच्या वेळी मातीभराव टाकण्यात येत असल्याने हे कुणाच्याही निदर्शनास आले नाही. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले, मात्र तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.  ही जागा ससाणे या खातेदाराची आहे. त्यांच्यावर आधीदेखील तीन प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यावरणवाद्यांची नाराजी

तिवरांची कत्तल समोर आल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी परिसरातील इतर जागेवरील झाडांना आगी लावण्यात आल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून ही कत्तल सुरू होती. परंतु तेव्हा प्रशासनाने कारवाई केली नाही. आता ही कत्तल झाल्यानंतर गुन्हा दाखल करून काय उपयोग आहे, अशी खंत स्थानिक पर्यावरणवाद्यंनी व्यक्त केली.

ही जागा सव्‍‌र्हे क्रमांक ६० असून या जागेवर तिवरांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे. त्यावर मातीभरावही टाकण्यात आला आहे. आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच पाहणी करून पंचनामा केला आणि गुन्हा दाखल केला आहे.

डी. एन. जाधव, नायब तहसीलदार

नायगाव येथे तिवरांच्या झाडांवर मातीभराव टाकला असल्याची घटना समजताच आम्ही भारतीय पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

गजेंद्र पाटोळे, तहसीलदार, वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:57 am

Web Title: mangroves issue 2
Next Stories
1 खाऊखुशाल : लज्जतदार ‘मलई बिर्याणी’
2 भिवंडीत मोदी डाइंग कंपनीला भीषण आग
3 ठाण्यात शिंदेशाहीच!
Just Now!
X