टाकवहाळ येथे प्रशस्त इमारत; अतिदक्षता विभाग आणि २० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर; ७४ कोटी १७ लाखांचा निधी मंजूर

मनोर येथील सध्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाले असून त्याअंतर्गत याच परिसरातील टाकवहाळ येथे दोनशे खाटांचे रुग्णालय बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याच अंतर्गत महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाच्या माध्यमातून २० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटरलाही मान्यता मिळाली असून ते या रुग्णालयातच उभे राहणार आहे. या कामासाठी ७४ कोटी १७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे.

मनोरचे नव्याने उभे राहणारे ग्रामीण रुग्णालय महसूल भवनाशेजारी उभे राहणार आहे. रुग्णालयासाठी १.५२ हेक्टर जमीन महसूल विभागाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. रुग्णालय तळमजला व त्यावर चार मजले असे राहणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याचे पत्रक बनवण्याची कामे सुरू असून त्यानंतर तांत्रिक मान्यता व पुढे निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर या रुग्णालयाचे काम सुरू होईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. ही निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसात राबविण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दरवर्षी होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ट्रॉमा केअर सेंटरची मागणी जोर धरत होती. याच रुग्णालयाअंतर्गत आता ट्रॉमा केअर सेंटरची मागणीही पूर्ण होणार आहे. हे २०० खाटांचे रुग्णालय जिल्हावासीयांना वरदान ठरणार आहे. मुंबईतील सर जे.जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने या इमारतीचे वास्तुचित्र तयार केले असून, त्यानुसार या खर्चाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता असलेले मनोर येथील ग्रामीण रुग्णालय हे या रुग्णालयात सामावणार असून, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी कर्मचारी निवासस्थाने होणार असल्याचा अंदाज आहे.

या रुग्णालयाचे एकूण बांधीव क्षेत्र १९ हजार ६७५ चौरस मीटर आहे. तळमजला व वाहनतळ मिळून २ हजार ५३६ चौरस मीटर क्षेत्र असून त्यातील २५६ चौरस मीटर क्षेत्र वापराखाली असणार आहे. या इमारतीचा तळमजला ३ हजार २६६ चौरस मीटर, पहिला मजला ३ हजार ७६१ चौरस मीटर, दुसरा मजला ३ हजार ७११ चौरस मीटर, तिसरा मजला ३ हजार ७११ चौरस मीटर, तर चौथा मजला २ हजार ६०० चौरस मीटर इतका असणार आहे.

रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र, बाह्य़रुग्ण तपासणी विभाग तसेच २० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर असे विभाग तळमजल्यावर असतील अशी रचना करण्यात आली आहे. वरच्या तळमजल्यात आहारगृह, रुग्णालयाचे प्रशासकीय कार्यालय तसेच अद्ययावत शस्त्रक्रियागृह व प्रसूतिगृह अशी रचना ठेवण्यात आली आहे.

या रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत अद्ययावत सी.टी. स्कॅन, डिजिटल एक्स-रे, अल्ट्रा सोनोग्राफी, ऑक्सिजन प्लांट, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटही राहणार आहे. पहिल्या मजल्यावर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व चाचणी प्रयोगशाळा ठेवण्यात आली असून या मजल्याच्या काही क्षेत्रात वॉर्ड आहेत. दुसरा मजला हा संपूर्णपणे पुरुष व महिला रुग्णांसाठीचे वॉर्ड असणार आहेत. तिसऱ्या मजल्यावर सभागृह व रुग्णांच्या नातेवाइकांसाठी वसतिगृह (डोर्मेट्रीज) ठेवण्यात येणार आहे.

या इमारत परिसराच्या क्षेत्रात येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थान इमारतही बांधण्यात येणार असल्याचे समजते आहे. या महामार्गावरचे अपघातांचे प्रमाण लक्षात घेता अपघातातील रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरेल. २०० खाटांच्या या रुग्णालयामुळे दुर्गम भागातील जिल्हावासीयांना याचा फायदा होईल. आवश्यक त्या सर्व सुविधा येथे उपलब्ध होणार असल्यामुळे येथील रुग्णांना यापुढे मुंबई किंवा गुजरातकडे उपचारांसाठी जावे लागणार नाही याचा आनंद आहे.

– डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक