पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्यांना वनविभागाची नकारघंटा

ठाणेकरांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी वन विभागाने मोठा गाजावाजा करत मानपाडा येथे निसर्ग पर्यटन केंद्राची उभारणी केली असली तरी या केंद्रात पर्यावरणपूरक उपक्रमच होईनासे झाले आहेत. या केंद्रात पर्यावरणविषयक उपक्रम राबवू इच्छिणाऱ्या पर्यावरव संस्थांना वनविभागाकडून नकारघंटा ऐकायला मिळत असल्याने या पर्यटन केंद्राचा नेमका उद्देश काय, असा सवाल या संस्था विचारत आहेत.

ठाणे शहरातील नागरिकांना शहरातच वन पर्यटन घडावे यासाठी मानपाडा येथे तीन वर्षांपूर्वी पर्यटन केंद्राची उभारणी करण्यात आली. मानपाडा परिसरात निसर्गभ्रमंती, फुलपाखरू उद्यान, पक्षीनिरीक्षण यांसारख्या निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या गोष्टी पर्यटकांना उपलब्ध करुन देत वनविभागातर्फे हे पर्यटन केंद्र सुरू झाले. पर्यटन केंद्राचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांकडून वनविभागातर्फे प्रवेश शुल्क आकारण्यात येते. मात्र या पर्यटन केंद्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाप्रमाणे वेगवेगळ्या पर्यटनविषयक उपक्रमांचा समावेश नसल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओढा तुरळकच असल्याचे  पर्यावरण संस्थांचे म्हणणे आहे. मानपाडा पर्यटन केंद्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. या संदर्भात गेल्या वर्षी पर्यावरण दक्षता मंचतर्फे पर्यटन केंद्रात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वनविभागाच्या साहाय्याने आयोजित करण्यासाठी मागणीपत्र पाठवण्यात आले होते. पर्यटकांना विविध पक्ष्यांची ओळख करून देणे, पक्षीअभ्यासकांसाठी विशेष कार्यशाळा, जंगलातील आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी पर्यटकांना विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र  असे उपक्रम वनविभाग आणि पर्यावरण संस्था यांच्यातर्फे एकत्रित आयोजित करण्यासाठी परवानगी येऊर वनविभागाकडे देण्यात आलेल्या मागणी पत्रात मांडण्यात आली होती. मात्र, या पत्राला वनविभागाने उत्तर दिलेले नाही.

पर्यटकांना निसर्गभ्रमंतीसाठी मानपाडा केंद्र खुले असल्याचा दावा येऊरच्या वनविभागातर्फे करण्यात येत असला तरी या पर्यटन केंद्राची माहिती जास्तीत जास्त  नागरिकांपर्यंत पोहचवण्यात तसेच पर्यटन पूरक उपक्रम आयोजित करण्यात वनविभाग अपयशी ठरत आहे.

मानपाडा पर्यटन केंद्र पर्यावरणीयदृष्टय़ा समृद्ध आहे. वनविभागाकडे पर्यावरण दक्षता मंचातर्फे या केंद्रात विविध उपक्रम राबवण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र अद्याप वनविभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पर्यावरण संस्थांनादेखील पुढाकार घेऊन काही करता येत नाही.

अविनाश भगत, पर्यावरण दक्षता मंच, ठाणे