सध्या कचरा व्यवस्थापन हा महापालिकेसमोर मोठा जटिल प्रश्न उभा  असताना त्यात सॅनिटरी नॅपकिनची अधिक भर पडली आहे. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट  लावण्यासाठी वसई-विरार महापालिकेने यावर उपाय शोधत एका खाजगी कंपनीकडून पर्यावरणपूरक एक यंत्र तयार करून घेतले आहे. त्याद्वारे सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याचा महापालिकेचा मानस आहे.

दिवसाला एकूण निघणाऱ्या कचऱ्यापैकी १०० ते १५० किलो कचरा सॅनेटरी नॅपकिनचा निघत आहे. यामुळे सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट ही महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र त्यावर उपाय म्हणून प्रायोगिक तत्त्वावर  हे यंत्र बसविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर संपूर्ण शहरात हे यंत्र बसविले जाणार असल्याची माहिती वसई-विरार महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दिली आहे.

सॅनिटरी पॅड डिस्पोजल असे या यंत्राचे नाव असून एका इंजिनीअरिंग कंपनीने याची निर्मिती केली आहे. साधारणत: २० ते २५ किलो वजनाची ही मशीन दीड ते दोन फूट आहे. यामुळे ही भिंतीवर सहज टांगणे शक्य आहे. या मशीनमध्ये एक हिटिंग कॉईल आहे ज्याच्या सहायाने सॅनिटरी नॅपकिन जाळले जातात. पण यामध्ये हवा जाण्यासाठी एक पंखा बसविला असल्याने त्यातून कार्बन मोनाक्साईडची निर्मिती होत नाही. एकावेळी ३ सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याची या मशीनची क्षमता आहे. यातून केवळ एक ग्राम राख तयार होते. हे स्वयंचलित यंत्र असल्याने ऑपरेटरची गरज नाही. तसेच हे मशीन काम झाल्यावर बंद पडते. यामुळे सध्या महापालिकेला सतावत असेलला सॅनिटरी नॅपकिनचा प्रश्न या मशीन च्या साहाय्याने मार्गी लागला जाणार आहे. पण त्याचे खरे स्वरूप चाचणीनंतर समोर येईल.