भिवंडी-शिळफाटा रस्त्यावरील वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून शासनाने शिळफाटा (दत्तमंदिर) ते भिवंडी जंक्शनदरम्यान २१ किलोमीटरच्या सहापदरी बाह्य़वळण रस्त्याचे काम हाती घेतले आहे. त्यात अत्यावश्यक ठिकाणी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहेत. ३८९ कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी या शहरांदरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे. मात्र कागदावर आदर्शवत वाटणाऱ्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक संभाव्य अडथळे आहेत.

कल्याण, डोंबिवली शहरात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची एक खासीयत आहे. या ठिकाणी विकासकामे ढीगभर काढली जातात. धडाधड निविदा आणि वाटप होते. कामे सुरू करून दिली जातात. त्यानंतर येणाऱ्या समस्या त्या विकासकामात अशा काही खो घालतात की ती कामे १० वर्षे पुढे सरकत नाहीत. याचा अनुभव केंद्र शासनाच्या ‘जवाहरलाल नेहरू अभियान’, ‘झोपु’ योजना प्रकल्पांच्या माध्यमातून शहरवासीय घेत आहेत. या गोंगाटात ठेकेदार, सल्लागार देयक काढून पळून जातात. स्थानिक नियंत्रक अधिकारी ‘आम्हाला पुढचे काहीच माहिती नव्हते. आता निधी नाही,’ म्हणत रखडलेल्या कामाकडे पाहत बसतात. १० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याचे उदाहरण यासाठी पुरेसे आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या कामाची प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तेच महामंडळ आता शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण आणि उन्नत मार्गाचे काम करणार आहे. या रस्ते रुंदीकरण कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदार नियुक्त केला जाईल. पालकमंत्री आणि महामंडळाचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या तालुक्यात हा रस्ता होणार आहे. त्यामुळे या कामात कोणतीही उणीव राहणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांकडून घेतली जाईल. पण, मुख्य प्रश्नाकडेही या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. भिवंडीकडून कल्याण शहरात येताना कोन परिसरातील प्रवाशांना वाहतूक कोंडी सहन करावा लागते. या मार्गाला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे संथगतीने ‘पालखी’सारखी वाहने या भागातून मार्ग काढत दुर्गाडी पुलावरून कल्याणमध्ये शिरतात. मग, लालचौकी ते शिवाजी चौक-पत्रीपूल रस्त्यावर चालकांना मुंगीच्या गतीने पुढे सरकावे लागते.

शिवाजी चौक मार्गाची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ज्या उद्देशाने गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता कल्याण शहराबाहेरून बांधण्यात आला. त्या रस्त्यावर एकूण ४२ गतिरोधक स्थानिकांनी आपल्या मर्जीने बांधले आहेत. दोन वर्षे महापौर हे गतिरोधक हटवा म्हणून अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत. परंतु, या भागातील नगरसेवकांचा पालिकेतील सत्तेला टेकू असल्याने त्यांची नाराजी नको म्हणून नागरिकांना त्रास झाला तरी चालेल; पण गतिरोधकांना हटविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कधी जोर लावला जात नाही. या गतिरोधकामुळे सर्व अवजड, चारचाकी कारचालक सततची आदळआपट टाळण्यासाठी शिवाजी चौकमार्गे शिळफाटा दिशेने जातात. गोविंदवाडी रस्त्यावरून पाठदुखीचा आजार न जडलेले ती होईपर्यंत आपल्या वाहनाने ये-जा करतात. कामाचा भलामोठा निधी समोर असल्याने कामे तत्पर सुरू केली जातात. अनेक वेळा ती मार्गी लावली जातात; पण त्यानंतर होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मात्र कोणी पुढाकार घेत नाही. तसे या रस्त्याचे होऊ नये.

कोन गावातील रस्त्याच्या दुतर्फा घरे, इमारती आहेत. तेथील रहिवाशांचा उन्नत मार्गाला विरोध होण्याची शक्यता आहे. तीच समस्या दुर्गाडी किल्ला, लालचौकी ते सहजानंद चौक, शिवाजी चौक ते पत्रीपूल रस्त्याच्या दरम्यान येणार आहे. या भागातील रहिवाशांनी वर्षांनुवर्षे पालिकेला रस्त्यासाठी १० ते १५ फूट जागा यापूर्वीच दिली आहे. अनेकांना त्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. वर्षांनुवर्षे पालिकेला नागरी सुविधांसाठी जमीन उपलब्ध करून देणारे रहिवासी पालिकेच्या दारात जमिनीचा मोबदला द्या, म्हणून सतत येरझऱ्या मारतात. असा वर्षांनुवर्षांचा अनुभव गाठीशी असणारे रहिवासी खरेच तत्पर पालिकेला जमीन उपलब्ध करून देतील का? निमुळता रस्ता असलेल्या कोन, कल्याणमधील रस्त्याचे रुंदीकरण किंवा त्या ठिकाणी उन्नत मार्ग कसा प्रस्तावित असेल? जिथे जमीन सहज उपलब्ध आहे, तिथे ठेकेदार रुंदीकरण, उन्नत मार्ग, उड्डाण पूल बांधून मोकळा होईल. जेव्हा नागरी वस्तीमधील जमिनीचे प्रश्न येणार आहेत. तिथे मोबदला, न्यायालयीन प्रश्न उपस्थित होणार आहेत. मोकळ्या जागेत विकास आणि नागरी वस्तीत कोंडी असे चित्र शिळफाटा प्रस्तावित रस्त्याचे दिसू नये यासाठी अगोदर काळजी घेणे आवश्यक आहे. शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे म्हणून ‘काहींनी’ मानपाडा परिसरातील मोक्याच्या जमिनी कब्जात घेतल्या आहेत. केवळ त्यांचेच भले करण्यासाठी ही सगळी घाई असेल तर शिळफाटा रुंदीकरण किंवा उन्नत मार्गाचा हेतू कधीच सफल होणार नाही. याउलट मूळ प्रश्न बाजूला सारून केलेली ‘ही’ घाई पुढे भयावह अशा गुंतागुंतीच्या वाहतूक कोंडीला आमंत्रण देईल. याची जाणीव संबंधितांनी ठेवणे आवश्यक आहे. विस्थापित होणाऱ्यांना  पालिका, महामंडळ की महसूल विभाग मोबदला देणार हेही निश्चित होणे आवश्यक आहे. २००६च्या दरम्यान कोन ते कचोरे (खाडीवर) ते नंदी पॅलेस हॉटेल असा एक उड्डाण पूल-रस्ता प्रस्तावित होता. या पुलामुळे कल्याणमधील कोंडीने खरच मोकळा श्वास घेतला असता. पण, तो प्रस्तावित पूल महामंडळाने रद्द केल्याची माहिती आहे. म्हणजे रुंदीकरण, उन्नतचा भार कल्याण शहरावर पडणार आहे.

कल्याणमधील मेट्रोचा शेवटचा थांबा बाजार समितीलगतच्या रस्त्यावर आहे. याच मार्गावर शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण किंवा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. रुंदीकरण अगोदर झाले; मग त्या ठिकाणी मेट्रो थांबा कसा आणि कोठे बांधणार? समजा, मेट्रो थांबा अगोदर बांधून झाला, मग रुंदीकरणाचे काय? शिळफाटा रुंदीकरण, मेट्रो मार्ग हे प्रकल्प शहर विकासाच्या, कोंडी फोडण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. पण, या प्रकल्पांमधील बारकावे आणि गुंता हे प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच सोडविले नाहीत; तर दळणवळणाचे नवीन कोंडाळे या शहरात शासनातर्फे तयार केले जाईल.