रक्तद्रव दानासाठी अनेकांची संस्थांकडे नोंदणी

डोंबिवली : डोंबिवलीत रविवार विविध सामाजिक संस्थांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८३५ रहिवाशांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुण वर्गाचा सर्वाधिक सहभाग होता. करोना होऊन प्रतिपिंड तयार झालेल्या रहिवासी, तरुणांनी रक्तदान केले. रक्तद्रव (प्लाझ्मा) दानासाठी अनेकांनी संस्थांकडे नोंदणी केली.

करोना रुग्णांना प्रसंगी रक्तदानाची गरज लागते. शासनाने सामाजिक संस्थांना आवाहन करून रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित करण्यासाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीतील भारत विकास परिषद, विवेकानंद सेवा मंडळ, भाजप युवा मोर्चा, व्योम संस्था आणि कल्याण डोंबिवली आयसीएआय शाखा यांच्यातर्फे सर्वेश सभागृहात रविवारी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. २१७ रक्तदाते या शिबिरात सहभागी झाले होते.  काहींनी करोना रुग्णांना रक्तद्रव (प्लाझ्मा) देण्यासाठी नोंदणी केली. गरजेप्रमाणे ते दानासाठी तयार असणार आहेत, असे संयोजक प्रवीण दुधे यांनी सांगितले. रक्तदान शिबिरात सहभागी दात्यांची एक संचिका तयार करण्यात येणार आहे. रक्तद्रव दात्यांची स्वतंत्र संचिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे संयोजकांनी सांगितले.

डोंबिवली औषध विक्रेता संघटना, अन्न आणि औषध विभाग, रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट यांच्यातर्फे रोटरी भवनमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.  या शिबिराला औषध विक्रेता संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रवीण मुंदडा उपस्थित होते. सद्यपरिस्थितीत रक्ताची खूप गरज आहे, त्यामुळे सामाजिक संस्थांनी रक्तदानाचे उपक्रम शहर, गाव भागांत राबविले पाहिजेत, असे मुंदडा यांनी सांगितले.