वसई-विरार महापालिकेच्या अनेक योजना सात वर्षांपासून प्रलंबित

वसई : वसई-विररार महापालिकेच्या अनेक योजना गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यात रो रो सेवा, वस्तूसंग्रहालय, बहुमजली वाहनतळ आदींचा समावेश आहे. तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे या योजना रखडल्या होत्या. आता त्या अंतिम टप्प्यात असून या वर्षांत त्या पूर्ण होतील, असा दावा पालिकेने केला आहे.

शहराच्या विकासासाठी महापालिकेने अनेक योजना आखल्या होत्या. मागील सात वर्षांपासून या सर्व योजना आणि निर्णय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात येत होते. त्यासाठी तरतूद करण्यात येत होती. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता २०१९- २० या आर्थिक वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व योजना आतापर्यंत कागदावरच राहिल्या आहेत. त्यांची पूर्तता झालेली नाही, प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत. मग पुन्हा हे प्रकल्पा दिशाभूल करण्यासाठी आणले का, असा सवाल शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी  सभागृहात केला.

महापालिकेने मात्र या तांत्रिक अडचणींमुळे या योजनांची पूर्तता यापूर्वी झाली नसल्याचे सांगितले. योजनांचा आराखडा तयार आहे. त्यामुळे त्याची तरतूद आम्ही अर्थसंकल्पात केली होती, असे स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी सांगितले. रो रो सेवा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्याला सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र कायद्याची अडचण आली होती. त्यामुळे तो रखडला होता. आता त्याच्या अटी शिथिल झाल्याने तो प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. वसईतील सर्व समाजाच्या पारंपारिक वस्तू, अवजारे, वसईच्या संस्कृतीची अवशेष संग्रहित करण्यात आली असून त्याचे वस्तुसंग्रहालय केले जाणार आहे. बहुजमली वाहनतळासाठी खाजगी जागा भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे हा प्रकल्पही या वर्षांत कार्यान्वित होणार आहे. मोबाइल मनोऱ्याचे धोरण राबवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व मनोऱ्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यांना शास्तीसह शुल्क आकारले जाणार आहे. येत्या एक दोन दिवसांतच ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शहरातील सर्व निवासी आणि वाणिज्यविषयक इमारतींचे लेखापरीक्षण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.

अंदाजपत्रकाला मंजुरी

वसई-विरार महापालिकेच्या २०१९-२० या आर्थिक वर्षांचा १८५७ कोटी ६५ लाख रुपये खर्च आणि ४०५ कोटी १५ लाख रुपये शिलकीचा असा एकूण २२६२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात आले. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकांत स्थायी समितीने अनेक सुधारणा केल्या होत्या. गेल्या आठवडय़ात ते सभागृहापुढे मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. बुधवारी त्यावर चर्चा झाली. विविध सदस्यानी आपल्या सूचना मांडल्यानंतर ते मंजूर करण्यात आले.

रखडलेल्या योजना कोणत्या?

रो रो सेवा, दुर्मिळ पक्षी आणि प्राणी तसेच वनस्पतींचा समावेश असेलेल निसर्ग उद्यान, वसईचा पुरातन आणि पारंपरिक ठेवा जतन करणारे वस्तुसंग्रहालय, बहुजमजली स्वयंचलित वाहनतळ, स्कायवॉकला जीने, सर्व सरकारी आस्थापनांचे लेखापरीक्षण, शैक्षणिक संस्था, शॉपिंग मॉल, वाणिज्यविषयक आस्थापनांचे लेखापरीक्षण, मोबाइल मनोऱ्यांविषयी धोरण.

महापालिका आकर्षक योजनांची घोषणा करते, मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. या अर्थसंकल्पात जुन्याच योजना आणल्या आहेत. त्या कागदोपत्री दाखवून काय उपयोग?

– किरण चेंदवणकर, गटनेत्या, शिवसेना</strong>

योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आधी तरतूद करावी लागते. ती आम्ही केली. अनेक योजनात तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी येत होत्या. आता त्या मार्गी लागत आहे. आगामी आर्थिक वर्षांत नागरिकांना या योजना पूर्ण झालेल्या दिसतील.

– सुदेश चौधरी, सभापती, स्थायी समिती

महापालिकेच्या अर्थसंकल्पात वसई-विरार शहरातील विविध प्रकल्पांची तरतूद करण्यात आलेली आहे.  त्यानुसार त्या त्या विभागासाठी नेमलेले अधिकारी अंमलबजावणी करीत असतात.  हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील.

– किशोर गवस, उपायुक्त, महापालिका