News Flash

जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद

ठाणे शहरातील ५६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ एकच केंद्र सुरू असल्याचे दिसून आले.

लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नाही; ठाणे शहरात ५६पैकी एकच केंद्र सुरू

ठाणे : जिल्ह्यात पुन्हा लशींचा तुटवडा भासू लागला असून सोमवारी जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंदे्र बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. लशींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातही लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना लसविनाच माघारी परतावे लागले. तर ठाणे शहरातील ५६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ एकच केंद्र सुरू असल्याचे दिसून आले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याला करोना प्रतिबंधात्मक लशींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यात वेगाने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला अर्धविराम लागल्याची चिन्हे आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण या भागात शासकीय आणि खासगी असे एकूण २३२ लसीकरण केंदे्र आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज १०० नागरिकांचे  लसीकरण करण्याचे शासनाचे लक्ष आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा भासू लागल्यामुळे अनेक लसीकरण केंदे्र बंद ठेवावी लागत आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज सरासरी १८०० ते २ हजार नागरिकांना लस देण्यात येते. त्यामुळे या केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र सोमवारी या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने येथील लसीकरण बंद ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शहरांमधील किती लसीकरण केंद्रे बंद?

ठाणे :

ठाणे महापालिका क्षेत्रात ५६ लसीकरण केंद्रे आहेत. त्यापैकी सोमवारी केवळ ग्लोबल रुग्णालयातच लसीकरण सुरू होते. तेथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत होती. तर इतर ५५ केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.

कल्याण-डोंबिवली

शहरात १६ लसीकरण केंद्रे असून यापैकी ९ ते १० केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत, तर कल्याणमधील आर्ट गॅलरी या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत असून इतर उर्वरित केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होते. मात्र या ठिकाणी एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

भिवंडी :

शहरात महापालिकेने १० लसीकरण केंद्रे सुरू केली होती. मात्र, पुरेसा लशींचा साठा उपलब्ध नसल्याने सहा केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तर, उर्वरित चार केंद्रांपैकी दोन केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील आणि इतर दोन केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहेत.

ठाणे ग्रामीण :

ठाणे ग्रामीणमध्ये ४१ लसीकरण केंद्रे असून त्यापैकी लशींच्या साठ्याअभावी केवळ सात केंद्रेच सुरू होती. या केंद्रांवर सोमवारी सकाळपर्यंत १५०० कोविशिल्ड लशींचा साठा शिल्लक  होता.

उल्हासनगर

शहरात नऊ लसीकरण केंद्रे असून त्यापैकी सोमवारी दोनच केंद्रे सुरू होती. या केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत होती. शहरातील दोनच केंद्रे सुरू असल्याने नागरिकांची या केंद्रांवर गर्दी झालेली दिसून आली.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील सर्व लसीकरण केंदे्र बंद होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:07 am

Web Title: many vaccination centers in the district closed akp 94
Next Stories
1 करोनाबाधित बालकांसाठी स्वतंत्र कक्ष
2 कठोर निर्बंध कागदावरच
3 भिवंडीत बसगाडी चोरणारे अटकेत
Just Now!
X