मुंबईत भाजीपाला पाठविण्यासाठी अहमहमिका

फरसबी आणि वाटाणा ७० रुपये किलो, मेथीची जुडी ५० रुपयांना, ढोबळी मिरची ६० रुपये किलो.. भाज्यांचे हे दर घाऊक बाजारातले, शुक्रवारचे.. आणि यातील बहुतांश भाज्या परराज्यांतून आलेल्या.. राज्यातील शेतकरी सध्या संपावर असल्यामुळे गुजरात, कर्नाटक, नवी दिल्ली, मध्य प्रदेश अशा परराज्यांतील शेतकरी-व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. संपामुळे मागणी आणि पुरवठय़ाचे गणित कोलमडल्याने परराज्यांतील शेतकरी-व्यापाऱ्यांनी इतर दिवसांच्या तुलनेत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसराकडे शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात भाजीपाला रवाना केला. कर्नाटकातून आलेले आलं, टोमॅटो तसेच गुजरातची ढोबळी मिरची, कोबी अशा भाज्या गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तिप्पट दराने विकल्या जात होत्या.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला दररोज १८०० टन भाज्यांची आवश्यकता असते. बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या कल्याण आणि वाशी बाजारात दिवसाला सरासरी ८०० ते ९०० गाडय़ांची आवक होत असते. मात्र, संपामुळे गाडय़ांची आवक मोठय़ा प्रमाणात घटली आहे. एरवी वाशीतील घाऊक बाजारात गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली अशा राज्यांतून सरासरी २०० ते २५० वाहनांमधून भाज्या येत असतात. राज्यातील भाज्यांच्या आवकेमुळे परराज्यातील भाज्यांचे दरही नियंत्रणात रहातात. शुक्रवारपासून मात्र नाशिक जिल्ह्यातून जेमतेम आठ ते दहा वाहने वाशीच्या घाऊक बाजारात आल्याचे पाहून परराज्यांतील व्यापाऱ्यांनी तिप्पट दराने भाज्यांची विक्री केली, अशी माहिती या बाजारातील एका मोठय़ा व्यापाऱ्याने दिली. आवक कमी असल्याने ही दरवाढ होणे अपेक्षित होते. मात्र, एका दिवसात घाऊक बाजारात तिपटीने भाज्या महागण्याची ही अपवादात्मक परिस्थिती म्हणायला हवी, असेही या व्यापाऱ्याने स्पष्ट केले.

कर्नाटकी माल तेजीत

पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातून पुरवठा होणारा मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता या हिरव्या मसाल्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने घाऊक बाजारात कर्नाटक तसेच गुजरातचे आलं (२८ रुपये), मिरची (५२ रुपये), कोथिंबीर (११० रुपये) गुरुवारच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट दराने विकली जात होती. राज्यातील टोमॅटोचे दर गुरुवारी किलोमागे १८ रुपये इतके होते, कर्नाटकच्या टोमॅटोची विक्री शुक्रवारी ३२ रुपयांनी करण्यात आली. फरसबी (७० रुपये), फ्लॉवर (२० रुपये), गाजर (२६ रुपये), ढोबळी मिरची (६० रुपये), वाटाणा (७० रुपये), मेथीची जुडी (५० रुपये) अशा प्रमुख भाज्या गुरुवारच्या तुलनेत जादा दराने विकल्या जात होत्या. गुजरातमधील भाजीपाला मुंबई-अहमदाबाद मार्गे, तर कर्नाटकमधून येणारी भाजी पुणेमार्गे येत आहे, अशी माहिती बाजार समितीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले.