News Flash

‘नेवाळी’बाबत संरक्षणमंत्र्यांशी चर्चेतून मार्ग

आंदोलनाच्या वेळी ग्रामस्थांनी पोलिसांचे सर्वाधिक नुकसान केले आहे.

नेवाळीतील आंदोलनात मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

नेवाळी येथील संरक्षण विभागाच्या जमिनीवरून शेतकरी आणि सरकार यांच्यात सतत वाद होत असल्यामुळे हा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी लवकरच केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल. तिथे योग्य निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण भागातील आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. त्याचबरोबर या आंदोलन प्रकरणात कोणतीही निरपराध व्यक्ती अथवा शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

नेवाळी येथील अनेक वर्षे भिजत पडलेला संरक्षण विभागाची जमीन शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढावा. यासंदर्भात ग्रामस्थांची भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाल व नेवाळी पाडा येथे ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली. या वेळी ग्रामस्थांनी नेवाळीची जमीन शेतकऱ्यांना पुन्हा हस्तांतरित करावी, मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत चर्चा करावी. कोणाही निरपराध्यावर पोलिसांकडून अन्याय होणार नाही, अशी मागणी बैठकीत केली. तात्काळ आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षां निवासस्थानी भेट घेतली.

नेवाळी विमानतळाच्या जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा हस्तांतरित करण्यासाठी नौदल अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ, महसूल अधिकारी यांची एक समिती स्थापन करावी. या समितीसमोर नेवाळी विमानतळात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या सुनावण्या घ्याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. या विषयाबाबत लवकरच संरक्षणमंत्री जेटली, राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन या विषयी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

गेल्या आठवडय़ात नेवाळी येथे संरक्षण विभागाच्या ताब्यातील जमीन पुन्हा शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी या भागातील ग्रामस्थ व काही चाळ माफिया यांनी एकत्रितपणे नेवाळी नाका येथे आंदोलन केले. या आंदोलनात पोलिसांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले. पोलीस वाहनांची जाळपोळ करून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले. पोलिसांना लक्ष्य करण्यामध्ये १३५ आंदोलनकर्ते आघाडीवर होते.

आंदोलनकर्ते आता बिथरले

आंदोलनाच्या वेळी ग्रामस्थांनी पोलिसांचे सर्वाधिक नुकसान केले आहे. पोलिसांना बेदम मारहाण करून महिला पोलिसांचा विनयभंग केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्ते निश्चित करून त्यांची धरपकड सुरू केली आहे. अटकेच्या भीतीने काही आंदोलनकर्त्यांनी काही लोकप्रतिनिधींचा आश्रय घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केल्याने ‘राजकीय’ आंदोलनकर्ते बिथरले आहेत.

आरोपींवर ड्रोनची नजर 

नेवाळी येथील आंदोलनात सहभागी झालेल्या, पोलिसांना मारहाण तसेच त्यांच्या वाहनांचे नुकसान करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी नेवाळी परिसरातील गावांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती हिललाईन पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ सूत्राने दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:23 am

Web Title: marathi articles on nevali farmers protest
Next Stories
1 ‘वाईफ इज माय लाईफ’ म्हणत त्यांनी आयुष्य संपवले
2 Heavy Rain: पाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून
3 जलद लोकलची दारे दिव्यात बंदच
Just Now!
X