नवे ठाणेमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीचा बोऱ्या

‘नवे ठाणे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील वाहनांमुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याची बाब समोर आली आहे. दररोज ठाणे शहरातून आनंदनगर चेकनाका मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांपैकी ७० टक्के वाहने घोडबंदर परिसरातील असून ही वाहने सकाळी व सायंकाळी म्हणजेच कार्यालयीन वेळेत एकाच वेळी रस्त्यावर येत असल्याने कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. या परिसरातील रहिवाशांच्या वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गाशिवाय अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांत घोडबंदर परिसराचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून यामुळे या भागातील वाहनांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. घोडबंदर भागातील वाहतुकीसाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे घोडबंदरमधील नागरी वसाहतींमधील रहिवासी याच मार्गावरून प्रवास करतात. याशिवाय, जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहनेही याच मार्गावरून प्रवास करतात. या वाहतुकीसाठी एकूण १० पदरी रस्ता असलेला हा मार्ग अपुरा पडू लागला असून त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असली तरी या ठिकाणची वाहतूक कोंडी मात्र काही कमी झालेली दिसून येत नाही.

घोडबंदर परिसरात उभ्या राहिलेल्या नागरी वसाहतींमधील अनेक नागरिक मुंबई भागात कामाला आहेत. त्यापैकी बहुतेक नागरिक स्वत:च्या खासगी वाहनाने घर ते कार्यालयापर्यंतचा प्रवास करतात. सकाळच्या वेळेत ही वाहने घोडबंदर, ठाणे आणि आनंदनगर चेक नाकामार्गे मुंबईच्या दिशेने जातात आणि सायंकाळी पुन्हा याच मार्गे घोडबंदरला परतात. एकाच वेळी ही वाहने रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनांचा भार वाढून या ठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होताना दिसून येते. सकाळी ७.३० ते ९.३० आणि सायंकाळी ७ ते १० या वेळेत ही कोंडी होते. सायंकाळच्या वेळेत आनंदनगर चेक नाक्यावरून येणारी ७० टक्के वाहने ही घोडबंदरच्या दिशेने जाणारी असतात. त्यापैकी २० टक्के वाहने माजिवडा, मानपाडा तर २५ टक्के वाहने पातलीपाडा आणि उर्वरित कासारवडवली भागात जातात, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पर्यायी मार्गाचा विचार

अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे घोडबंदरवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या कोंडीतून सुटका करण्यासाठी पालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये श्रीनगर ते गायमुख असा डोंगरालगत तर गायमुख ते बाळकुम असा खाडीकिनारीलगतचा पर्यायी मार्गाचा विचार सुरू केला असून त्यांच्या उभारणीसाठीही प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

घोडबंदर परिसरातील महामार्गावर वाहनांचा भार वाढल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहनांमध्ये घोडबंदर परिसरातील नागरी वसाहतींमधील खासगी वाहनांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे. या रस्त्यावरील वाहतुकीत घोडबंदर परिसरातील वाहनांचे प्रमाण ७० टक्के आहे.  संदीप पालवे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा