19 January 2021

News Flash

मराठी वाङ्मयातील निवडक वेचक ‘पुनश्च’

सभासद वाचकांना संकेतस्थळ तसेच अ‍ॅपद्वारे मोबाइलवरही वाचता येतात.     

 

 

वाचकांची अभिरुची वाढवणारे डिजिटल नियतकालिक

आधुनिक युगातील मनोरंजन आणि माहितीच्या भडिमारात वाचन संस्कृती लोप पावण्याची भीती पुस्तकांच्या डिजिटल आवृत्त्यांनी खोटी ठरवली असून उलट या नव्या माध्यमामुळे मराठी वाङ्मयाचा परीघ विस्तारू लागला आहे. एकीकडे छापील स्वरूपाची वाङ्मयीन नियतकालिके एकेक करून बंद होत असली, तरी ‘पुनश्च’ हा त्याचा डिजिटल अवतार जगभरातील चोखंदळ मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय ठरू लागला आहे. ठाण्यातील तरुण उद्योजक किरण भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पुनश्च’ हे मराठीतील पहिले सशुल्क डिजिटल नियतकालिक सुरू केले असून अवघ्या सहा महिन्यात शेकडो वाचकांनी शंभर रुपये वार्षिक वर्गणी भरून साहित्य पंढरीच्या या आधुनिक वारीत सामील होणे पसंत केले आहे.

गेल्या दीडशे वर्षांतील विविध वाङ्मयीन नियतकालिके, दिवाळी अंक तसेच इतर नैमित्तिक स्वरूपात प्रसिद्ध झालेले लक्षवेधी आणि मौलिक साहित्य आठवडय़ाला दोन ते तीन लेख अशा मात्रेने ‘पुनश्च’मध्ये प्रसिद्ध केले जात आहे. सभासद वाचकांना संकेतस्थळ तसेच अ‍ॅपद्वारे मोबाइलवरही वाचता येतात.

महाराष्ट्रातील विविध नियतकालिकांमधून वेळोवेळी अनेक उत्तम लेख प्रसिद्ध झाले. मात्र धकाधकीच्या जीवनात अनेकांचे ते वाचायचे राहून गेले.

त्या नियतकलिकांची व्याप्तीही मर्यादित असल्याने खूपच थोडय़ा वाचकांपर्यंत ते लेखन पोहोचू शकले. ‘पुनश्च’चे संपादक मंडळ साहित्य सागरातील हे निवडक वाचनीय लेख दर आठवडय़ाला वाचकांना डिजिटल स्वरूपात देतात. ते साहित्य संकेतस्थळाद्वारे संगणक अथवा मोबाइलवर वाचता येते.  अनुभवकथन, चिंतन, व्यक्ती-संस्था परिचय, काव्य, चित्रपट, पुस्तक, कला रसास्वाद, समाजकारण, अर्थकारण, विनोद, माहिती, स्वमदत, विज्ञान, मृत्युलेख यासारखे २१ ललित साहित्य प्रकार ‘पुनश्च’द्वारे डिजिटल स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. आतापर्यंत या नियतकालिकात १५० हून अधिक लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? लोकमान्य टिळक की रंगारी चाळ ?, बालगंधर्वाची अखेर : एका महानायकाची शोकांतिका, इब्सेनचे अ‍ॅन एनिमी ऑफ द पीपल, आइनस्टाइनची खोली, मौजचे संपादक राम पटवर्धन यांच्यावरील आगळे वेगळे विद्यापीठ, आनंदीबाई पेशवे, राजा रामदेवराय यादव यांच्याविषयी वेगळी माहिती समोर आणणारे ऐतिहासिक लेख, अ.का. प्रियोळकर यांचा ‘चमत्कारांचा चमत्कार’, केसरीच्या १९६१ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला ‘साष्टांग नमस्कार आणि आचार्य अत्रे’, केसरीमध्येच १९६० मध्ये प्रसिद्ध झालेला पु. ल. देशपांडे यांचा ‘मी सिगरेट सोडतो’ असे अनेक वाचनीय लेख या संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.

निवड कशी होते?

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि बदलापूर येथील श्याम जोशी यांच्या ग्रंथसखा वाचनालयाच्या सहकार्याने किरण भिडे दर आठवडय़ाला बुधवार आणि शनिवारी एकेक लेख प्रसिद्ध करतात. लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी लेखकाची अथवा लेखन हक्क असलेल्या व्यक्तीची रीतसर परवानगी घेतली जाते. त्याबद्दल त्याला उचित मानधनही दिले जाते.

सभासद वर्गणी

https://punashcha.com या संकेतस्थळावर हे लेख उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शंभर रुपये भरून सभासद होणाऱ्या वाचकांना हे सर्व लेख वाचता येतात. याशिवाय या डिजिटल नियतकालिकामध्ये इच्छुक लेखकांना त्यांचे सशुल्क ब्लॉग प्रसिद्ध करण्याची मुभा आहे. ते विशिष्ट ब्लॉग वाचण्यासाठी वाचकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

गेल्या सहा महिन्यात या सशुल्क डिजिटल नियतकालिकाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. उत्तमोत्तम लेखांबरोबरच कठीण शब्द, म्हणी, वाक्प्रचारांचे अर्थ या नियतकालिकांत आम्ही देत आहोत. मराठी वाङ्मय खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर नेण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

किरण भिडे, उद्योजक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2018 3:29 am

Web Title: marathi literature digital magazine
Next Stories
1 उपनगरांना जलवाहतुकीचा पर्याय ; वसई-कल्याण-ठाणे जलमार्गास मंजुरी
2 छोटा भीमच्या साथीने १०० अनाथ मुलींच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन
3 वाहतूक बदलाची अधिसूचनाच नाही!
Just Now!
X