News Flash

मराठी शाळांचे माध्यमांतर

राठी माध्यमाच्या शाळांमधील एकूण पटसंख्येत सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांची बहुसंख्या आहे.

ठाणे शहरातील सरस्वती शाळेने सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारल्यानंतर एकूणच शैक्षणिक विश्वातील मराठी माध्यमाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. खरे तर इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांनी अर्ध इंग्रजी (सेमी इंग्लिश) पद्धत स्वीकारूनही आता बरीच र्वष झाली आहेत. वास्तवात केवळ सरस्वतीच नव्हे तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील अनेक शाळांनी काही प्रमाणात का होईना शैक्षणिक क्षेत्रातील बदलते वास्तव स्वीकारून काळानुरूप नवे बदल स्वीकारले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील एकूण पटसंख्येत सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांची बहुसंख्या आहे. काही शाळांनी मराठी माध्यम कायम ठेवत स्वतंत्र इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरविण्यास सुरुवातही केली आहे. काही शाळा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून मराठी माध्यमात विद्यार्थी पटसंख्या कायम ठेवण्यात यशस्वीही ठरल्या आहेत. मात्र तरीही इंग्रजीचा प्रभाव वाढतोय आणि एकूण मागणीच्या तुलनेत या शहरांमध्ये चांगल्या इंग्रजी शाळांची कमतरता आहे. त्यामुळे पालकांना नाईलाजाने नव्या, फारशा माहिती नसलेल्या इंग्रजी शाळांचा मार्ग पत्करावा लागतो.

अशा परिस्थितीत गेल्या अर्ध शतकाहून अधिक काळ चांगली शैक्षणिक परंपरा असलेल्या मराठी शाळांनी, मराठी माध्यम कायम ठेवत इंग्रजीचा पर्याय उपलब्ध करून दिला, तर बिघडले कुठे, असा सवाल संस्थाचालक करताना दिसतात. मध्यमवर्गीय समाजातील पालक आपल्या मुलांनी शक्यतो इंग्रजी अथवा सेमी इंग्रजी माध्यमात शिकावे असा आग्रह धरू लागल्याने संपूर्ण मराठी माध्यमातील एकूण मुलांची पटसंख्या घसरू लागली, हे वास्तव आहे. मात्र आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुले, जी पूर्वी पालिका अथवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जात होती, ती आता खाजगी शाळांमधील मराठी माध्यमाच्या वर्गात दिसू लागली आहेत. मराठी शाळांच्या या माध्यमांतरावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.

शिवसमर्थ विद्यालय, ठाणे

मातृभाषेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न

ठाणे शहरातील अग्रेसर मराठी शाळांमध्ये नौपाडा विभागातील शिवसमर्थ विद्यालयाने आपला दर्जा कायम राखलेला आहे. सध्या शिवसमर्थ शाळेत मराठी माध्यमाच्या पाचवी ते दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या एक हजार १८३ आहे. प्रत्येक इयत्तेत सेमी इंग्रजीचे दोन वर्ग असून ६११ विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत.

शिकण्यासाठी मातृभाषा केव्हाही योग्य ठरते. जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जास्त कल दिसून येतो. मराठी माध्यमाचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी पालकसभेत मराठी माध्यमाचे महत्त्व पटवून दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी दिन साजरा केला जातो, असे शिवसमर्थ शाळेचे मुख्याध्यापक निरंजन भागवत यांनी सांगितले.

न्यू इंग्लिश शाळा, ठाणे

मराठीचा वरचष्मा कायम

ठाण्यातील न्यू इंग्लिश शाळा जुनी मानली जाते. या शाळेतही सेमी इंग्रजी माध्यम असले तरी विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहता या घट झालेली दिसून येते. सध्या मराठी माध्यमातील पटसंख्या ९२५ असून सेमी इंग्रजीच्या माध्यमात एकूण पटसंख्येपैकी ३०० विद्यार्थी आहेत.

मराठी माध्यमात पाल्याला शिकवण्यासाठी पालकांचा दृष्टिकोन बदलायला हवा. कारण पालकच आता इंग्रजीचा आग्रह धरू लागले आहेत. मातृभाषेतील शिक्षणाचा जास्त उपयोग होतो. इंग्रजीमध्ये अर्थ समजून न घेता बहुतेकदा घोकंपट्टी केली जाते. मराठी माध्यम शाळेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अवांतर वाचन करून घेतले जाते. अभ्यासक्रमातील काही पाठांचे नाटय़ीकरण करून घेतले जाते. शाळांसोबतच पालकांनी आपली मानसिकता बदलल्यास मराठी शाळेचे भवितव्य टिकून राहील असे मुख्याध्यापिका वैशाली चव्हाण यांनी सांगितले.

मो. ह. विद्यालय

अवांतर वाचनासाठी एक तास राखीव

ठाणे शहरातील मो. ह. विद्यालयाने गेली अनेक वर्षे आपली मराठी शाळेची परंपरा जपलेली आहे. सध्या पाचवी ते दहावी इयत्तेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ११७४ आहे. यापैकी पाचवी ते सातवी इयत्तेचे प्रत्येकी चार वर्ग असून अनुक्रमे दोन सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत. आठवी इयत्तेत सात वर्ग, नववी आणि दहावीचे सहा वर्ग आहेत. प्रत्येक इयत्तेतील वर्गापैकी निम्मे वर्ग सेमी इंग्रजीचे आहेत. पूर्ण मराठी माध्यमापेक्षा सेमी इंग्रजी माध्यमाकडे कल दिसून येत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांत संपूर्ण मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या ११० ने कमी झाली. मराठी माध्यम टिकून राहावे यासाठी शासनाने शाळेचा एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवलेला आहे. ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले जाते. संत साहित्य, वाङ्मय यांचे पठण विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाते, असे मो.ह. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनी सांगितले.

‘स. वा. जोशी’तही ‘सीबीएसई’

डोंबिवलीतील पहिली शाळा अशी ओळख असणारी शाळा म्हणजे स. वा. जोशी शाळा. सुरुवातीला इंग्लिश स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेचे नंतर स. वा. जोशी शाळा असे नामकरण करण्यात आले. मराठी, सेमी इंग्रजी माध्यमाबरोबरच आता संस्थेने सीबीएसई माध्यमाची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयही सुरू केले आहे. इंग्रजी माध्यमांकडे आज पालकांचा कल वाढला आहे. कारण तिथे अधिक चांगल्या स्वरूपाच्या शैक्षणिक सुविधा मिळतात, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे इंग्रजीप्रमाणेच मराठी शाळांमध्येही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न संस्था करताना दिसत आहेत. पालक व माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने शाळेचे कामकाज चालते. इंग्रजी माध्यमांमध्ये ई-लर्निग, टॅब, सुसज्ज सुशोभित अशा शाळा असतात. अशा भौतिक सुविधा मराठी माध्यमांनाही मिळाल्या पाहिजेत. ८ वीपर्यंत मुलांना पुढील वर्गात पाठविले जात असल्याने काही मुले अभ्यासात मागे पडतात. अशा प्रकारे अभ्यासात कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा येथे स्वतंत्र वर्ग भरतो. मराठी माध्यमाचा टक्का वाढवावा तसेच मुलांना योग्य ते शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही शिक्षकांनाही त्यांच्या अध्यापनाची गती वाढविण्यास सांगत आहोत. ८वीच्या मुलांना सध्या टॅबचे वाटप करण्यात आले आहे. केवळ अभ्यासावर भर न देता विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या दृष्टीने स्पर्धा परीक्षा, खेळ, कवायती आदी शिक्षणही येथे दिले जाते, असे मुख्याध्यापक ए. बी. दावणे यांनी सांगितले.

’स. वा. जोशी विद्यालय, डोंबिवली

’विद्यार्थी संख्या- मराठी माध्यम – ३७५, सेमी इंग्रजी माध्यम झ्र् ६२३

टिळकनगरमध्ये पुढील वर्षांपासून लोकमान्य गुरुकुल

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर विद्यामंदिर शाळेस साठ वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभली आहे. मराठी माध्यमांच्या शाळांपैकी ही एक शाळा. काळानुरूप येथेही सेमी इंग्रजी माध्यम सुरूझालेअसले तरी मराठी माध्यमातून मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी शाळा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मुल्यशिक्षण, नीतिमत्तेचे शिक्षण, ज्ञानप्रबोधिनी शिबीर, वाचन संस्कार दिले जातात. गुणवत्ता विकासाची दर शनिवारी परीक्षा घेतली जाते. स्वराज्य सभा, उत्कर्ष व्याख्यानमाला, लैंगिक शिक्षण शाळेत दिले जाते. शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय आहे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता येईल, तसेच सेमी इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निगची सुविधा नुकतीच शाळेत सुरू करण्यात आली आहे. सेमी इंग्रजी माध्यमासाठी लोकमान्य गुरुकुल हा नवा उपक्रम पुढील वर्षीपासून सुरूकरण्यात येत आहे, असे मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 2:17 am

Web Title: marathi medium school turns into english medium
Next Stories
1 माध्यम मराठी, पण शिशूवर्गापासून इंग्रजी
2 ‘अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी शाळांच्या शिक्षकांनी ज्ञानसमृद्ध व्हावं’
3 मद्यपार्टीचा परवाना १३ हजारांत!
Just Now!
X