आदिवासी पाडय़ावरील ग्रामस्थांना मनोरंजनाची पर्वणी

घनदाट जंगल आणि निसर्गाच्या शांततेचा अनुभव देणाऱ्या वातावरणामुळे येऊरचे जंगल पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरले आहे. या निसर्ग पर्यटनासोबत येऊरमध्ये आता हौशी कलाकारांच्या नाटकांचे प्रयोग रंगू लागले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात संगीताचे कार्यक्रम, नाटकाचे प्रयोग सादर करण्यासाठी राज्यभरातील तरुण येऊरमध्ये दाखल होत असून यामुळे येऊर गावाला आता सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. ‘द आफ्टरक्लॅप’ या संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या या नाटय़प्रयोगासाठी येऊरमधील आदिवासी पाडय़ावरील ग्रामस्थांनाही मनोरंजनाचे माध्यम उपलब्ध होत आहे.

येऊरमध्ये गेल्या काही वर्षांत वाढलेले अनधिकृत बांधकाम, मद्यप्राशन करून केले जाणारे गैरवर्तन यामुळे येऊरचे निसर्ग पर्यटन धोक्यात असल्याच्या चर्चा वारंवार होत असतात. मात्र या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याबरोबर अंगीभूत असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी काही हौशी तरुण कलाकारांनी येऊर गावाला आपल्या सादरीकरणासाठी व्यासपीठाचे स्वरूप दिले आहे. भविष्यात मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करू इच्छिणाऱ्या उभरत्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे यासाठी ‘द आफ्टरक्लॅप’ या संस्थेची १२ डिसेंबर २०१६ रोजी स्थापना करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर कला सादर करण्याचा उद्देश असलेल्या तरुणांना नाटय़गृहांचे भाडे परवडणारे नसते. येऊरमधील निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या जागी साध्या तंबूत हे नाटय़प्रयोगांचे सादरीकरण होत असून ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणांहून प्रयोग सादर करण्यासाठी हौशी तरुण सुट्टीच्या दिवशी येऊरमध्ये गर्दी करत आहेत. या नाटक किंवा संगीताच्या प्रयोगांसाठी सादर करणाऱ्या कलाकारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसून प्रेक्षकांनाही हे मराठी, हिंदी प्रयोग विनामूल्य पाहण्याची संधी असते.

आदिवासी पाडय़ावर राहणाऱ्या आदिवासी ग्रामस्थांना मनोरंजनाची साधने क्वचित उपलब्ध होतात. त्यामुळे येऊरमध्ये होणाऱ्या या प्रयोगांविषयी आदिवासींमध्ये उत्सुकता असते. सध्या सुरू असलेल्या नाटय़प्रयोगाला आदिवासी पाडय़ावरील ग्रामस्थ हजेरी लावत असतात. या आदिवासी ग्रामस्थांची इच्छा असल्यास पुढील टप्प्यात त्यांनाही अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचा विचार आहे, असे संदीप पावस्कर यांनी सांगितले.

आतापर्यंत ३० प्रयोग

‘द आफ्टरक्लॅप’ संस्थेच्या वतीने नाटय़ प्रशिक्षणाची कार्यशाळा घेण्यात येत असून यात सेलेब्रिटी मंडळींपैकी अभिनेता ललित प्रभाकर, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी उपस्थिती दर्शवली होती.

संस्थेत हौशी तरुणांनी आतापर्यंत ३० प्रयोग या ठिकाणी सादर केले आहेत, असे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पावस्कर यांनी सांगितले. साध्या तंबूत होणारे नाटकाचे प्रयोग, संगीताचा प्रयोग असल्यास शेकोटी लावून संगीताचा आनंद लुटणे आणि येऊरच्या निसर्गातील शांतता हौशी कलाकारांना अधिक आकर्षित करते, असे त्यांनी सांगितले.