साहित्यप्रेमींसोबतच साहित्यिकांमध्येही आनंदाचे वातावरण; संमेलन यशस्वी करण्याचा मानस

भाषेतील गोडवा जपत, वास्तवाचे भान ठेवून, चिरकाल सत्याशी टिकाव धरतील, असे विचार आपल्या लेखनातून सातत्याने मांडून शब्दशारदेची सतत उपासना करणाऱ्या लेखकांनी डोंबिवलीची साहित्यिक श्रीमंती वर्षांनुवर्षे जपली. डोंबिवलीचे साहित्यविश्व हीच या शहराची ओळख बनली असताना यंदाचे साहित्य संमेलन या शहरात भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील साहित्यप्रेमींमधून उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

नियोजन आणि विकासकामांच्या आघाडीवर नेहमीच पिछाडीवर राहिलेले डोंबिवली शहर साहित्यिक उपक्रमांबाबत मात्र नेहमीच ठाणे, पुण्याशी स्पर्धा करताना दिसले. साहित्याची जाण, प्रसार आणि निर्मितीमध्येही या शहराने नेहमीच परिवर्तनाची कास धरली.

साहित्याची अनोखी परंपरा

साहित्याच्या नकाशावर डोंबिवलीची ओळख साता समुद्रापार गेली आहे. १९२४ साली श्रीमती गोदावरीबाई सातारकर या महिलेने साहित्यिक वाटचालीस सुरुवात केली. त्यांचा लेख ज्ञानेश्वर या ग्रंथात प्रसिद्ध झाला होता. तेव्हा गोदावरीबाई सातारकर ह्य़ा डोंबिवलीच्या पहिल्या ज्ञात लेखिका असून या लेखिकेने सुरू केलेल्या साहित्य दिंडीत क्रमाक्रमाने अनेक मान्यवर लेखक, कवी, प्रकाशक, मुद्रक, साहित्यिक संस्था सामील झाल्याचा उल्लेख डोंबिवलीकर इतिहासात आहे. या साहित्यिकांमध्ये पु.भा.भावे, शं.ना.नवरे, डॉ. राम बिवकर, ज.बा.कुलकर्णी, मधुकर जोशी, डॉ. सचिदानंद शेवडे, चंद्रशेखर कुलकर्णी यांसह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

डोंबिवली शहर म्हणजे साहित्याची मांदियाळीच आहे. असे असूनही अद्यापपर्यंत या शहराला साहित्य संमेलनाचा मान मिळाला नव्हता. साहित्याची परंपरा असलेल्या शहराला साहित्य संमेलनाचा मान मिळावा म्हणून येथील साहित्यिक गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. १९९५-९६ साली डोंबिवलीत नाटय़संमेलन मोठय़ा दिमाखात पार पडले. त्यानंतर येथे साहित्य संमेलनही होऊ शकते, असा आत्मविश्वास रसिकांना आला आणि साहित्य संमेलन डोंबिवलीत होण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यांना शहरातील आगरी युथ फोरमने साथ दिली आणि चार वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

इथे संमेलन होणार

डोंबिवली पूर्वेतील सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुल व सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सर्व कार्यक्रम होतील. तसेच पाहुण्यांची राहण्याची किंवा जेवणाची सोय आजूबाजूच्या परिसरातील जिमखाना, काही संस्थेची सभागृहे येथे करण्यात येणार आहे. तसेच वाहने उभी करण्यासाठी जिमखाना, निवासी विभागातील मोकळे भूखंड, क्रीडासंकुलात काही जागा असून सर्व काही नियोजन पद्धतीने पार पडेल.

 

डोंबिवलीत प्रथमच साहित्य संमेलन होत असून याची जबाबदारी आगरी युथ फोरमला मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी डोंबिवली शहराची अधिकृत घोषणा होऊन संमेलनाचे अध्यक्षपदही निश्चित होईल. त्यानंतर मग पुढील कार्यक्रमांची रूपरेषा आखली जाईल.  -गुलाब वझे, अध्यक्ष, आगरी युथ फोरम

साहित्य संमेलन डोंबिवली शहरात होत असल्याने आनंदच आहे. कल्याण सार्वजनिक वाचनालयाची मदत लागल्यास सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. नाटय़संमेलनानंतर आता साहित्य संमेलनही कल्याण डोंबिवली शहरात होत असल्याने हा साहित्य महामेळा नक्कीच आनंदात पार पडेल. -भिकू बारस्कर, पदाधिकारी, सार्वजनिक वाचनालय कल्याण

नाटय़संमेलनानंतर आता डोंबिवलीत साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे येथील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे शहर साहित्यिकांचे शहर असून एक वेगळी ओळख आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी नक्कीच सर्व स्तरातील वर्गाचे सहकार्य लाभेल. काहीतरी वेगळेपण करण्याचा विचार असून यात बालसाहित्याचाही समावेश करण्याचा विचार आहे. बालकांसाठीही या संमेलनात एक वेगळा मंच देण्याचा विचार आहे. -शुक्राचार्य गायकवाड, साहित्यिक

यापूर्वीच डोंबिवली शहराला हा मान मिळायला हवा होता. अखेर डोंबिवलीत साहित्य संमेलन होत असून ते साहित्यिकांसाठी नक्कीच मांदियाळी ठरेल. नक्कीच भूषणावह अशी ही बाब आहे. -सुलभा कोरे, कवयित्री