ऑगस्टअखेरीस खड्डे बुजविण्याचे महापौरांचे आश्वासन

ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील रस्ते खड्डेमुक्त केले जातील, असे आश्वासन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. असे असताना या खड्डेमय रस्त्यावरून स्पर्धक कसे धावणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर यंदा मॅरेथॉनची धावपट्टी खड्डेमुक्त असेल, असा दावा महापौरांनी केला. महापालिका प्रशासनाला या स्पर्धेपूर्वी खड्डे बुजविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून यंदा प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी ‘मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिकमुक्तीची’ असे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. हे घोषवाक्य घेऊन स्पर्धक धावतील. विविध ११ गटांत होणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण सात लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. स्पर्धकांची नोंदणी सुरू असून जवळपास २० हजारांहून अधिक स्पर्धक यात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत ठाणेकर नागरिकांनीही मोठया संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.

स्पर्धकांसाठी सेवा-सुविधा

  • विनामूल्य वैद्यकीय तपासणी, स्पर्धेच्या मार्गावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रुग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध.
  • स्पर्धकांसाठी टीएमटीच्या वतीने मोफत बससेवा

मॅरेथॉनमध्ये..

  • अवयदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टरांचा सहभाग
  • प्लास्टिकमुक्तीसाठी दोन किलोमीटर अंतराची जिल्हास्तरीय स्पर्धा
  • रविवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पालिका मुख्यालय चौकातून स्पर्धेला प्रारंभ
  • ल्ल स्पर्धेसाठी एकूण २३८ पंच, ९२ पायलट, शेकडो स्वयंसेवक, सुरक्षारक्षक
  • मिलेनियम टोयाटो शोरूम, वागळे इस्टेट येथे समाप्ती