जिल्ह्य़ात कमी, मात्र गुजरातमध्ये जास्त भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे मत

गुजरातमधील उंबरगाव, वापी येथील बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना झेंडू फुलांची विक्री करण्यासाठी गुजरातच्या बाजारपेठांमध्ये धाव घेतली आहे. पालघर, बोईसर, डहाणू येथील बाजारपेठांमध्ये झेंडूला ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे, तर उंबरगावमध्ये ६० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कलकत्ता रेड अष्टगंधा, यलो अ‍ॅरोगोल्ड या फुलांना पालघर जिल्ह्य़ात १०० रुपये भाव आहे, तर उंबरगावमध्ये १२५ रुपये किलोने विकला जात आहेत.

नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांमध्ये झेंडू फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळे बोर्डी, वाणगाव, केळवे, पालघर, सफाळे, वाडा, विक्रमगड परिसरातील बहुतेक शेतकरी झेंडूची लागवड करतात. वाहतूक खर्च, हमालीचा खर्च यांमुळे झेंडू उत्पादकांना मुंबईची बाजारपेठ परवडत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतच त्यांची विक्री केली जाते. मात्र यंदा स्थानिक बाजारपेठेत चांगला भाव मिळत नसल्याने जिल्ह्य़ातील झेंडू उत्पादकांनी आपला माल गुजरातमध्ये पाठवला आहे. वापी, उंबरगाव येथील बाजारपेठांमध्ये झेंडू फुलांना अधिक भाव मिळत असल्याने झेंडू उत्पादकांनी आपली फुले तेथील बाजारपेठांमध्ये नेली आहे. कलकत्ता रेड अष्टगंधा, यलो अ‍ॅरोगोल्ड या झेंडूच्या फुलांना गुजरातच्या बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा अवकाळी पावसामुळे झेंडूचे उत्पादन कमी झाले तरी गुजरातच्या बाजारपेठांमध्ये अधिक भाव मिळत असल्याने फायदा होणार असल्याचे झेंडू बागायतदारांनी सांगितले.

पालघर जिल्ह्य़ात बोर्डी येथे ३० वर्षांपासून झेंडूची शेती करतो. सध्या सहा एकर जागेत झेंडूची लागवड केली आहे. गुजरातमध्यील उंबरगाव येथील बाजारपेठेत माल जातो. फुलांच्या विक्रीतून सहा ते सात लाखांचे उत्पन्न मिळते.    – शीतल सावे, झेंडू बागायतदार, बोर्डी