ऐरोली खाडीकिनारी वसवलेल्या केंद्रात विविध जातींचे पक्षी, वनस्पतींचा समावेश 

मंगळावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना पृथ्वीवर अस्तित्त्वात असणाऱ्या जीवसृष्टीचा सन्मान केला जात नाही. या जीवसृष्टीचा सन्मान करण्याची जबाबदारी वनविभागासोबतच नागरिकांचीही आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ऐरोली येथे जैवविविधता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले. ऐरोली खाडी किनारी वनविभागातर्फे उभारण्यात आलेल्या किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्राचे उद्घाटन रविवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, सचिव विकास खारगे, कांदळवन विभाग मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, ठाणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये उपस्थित होते. महाराष्ट्रातील पहिले जैवविविधता केंद्र ठाणे शहरालगत उभारण्यात आले असल्याने ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील पर्यावरण प्रेमींना या जैवविविधता केंद्राचा लाभ घेता येणार आहे.

ठाणे खाडी किनारी रोहित (फ्लेमिंगो) पक्षी मोठय़ा संख्येने आढळत असल्याने ठाणे खाडी परिसर राज्य सरकारने ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून यापूर्वीच जाहीर केला आहे. या खाडी किनारी फ्लेमिंगो आणि इतर विविध पक्षी पाहण्याची संधी ठाणे, मुंबईतील नागरिकांना उपलब्ध होत असते. या पाश्र्वभूमीवर पर्यटकांना जैवविविधतेचा अनुभव घेता यावा, यासाठी कांदळवन विभागातर्फे हे पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. जर्मन-इंडो प्रकल्पाच्या माध्यमातून हे जैवविविधता केंद्र उभारण्यात आले असून खाडी किनारच्या जैवविविधता, पक्ष्यांविषयी दृकश्राव्य माध्यमातून पर्यटकांना माहिती उपलब्ध होणार आहे.

रात्रीची जैवविविधता, देवमाशाचा सांगाडा

या पर्यटन केंद्रात बॅटरीच्या साहाय्याने रात्रीची जैवविविधता अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. बॅटरीच्या साहाय्याने खारफुटीची रोपे, खाडीतील जैवविविधता, पक्षीजीवन पर्यटकांना पडद्यावर पाहता येणार आहे. कालांतराने पर्यटन केंद्राच्या ठिकाणी देवमाशाचा सांगाडा प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.

पक्ष्यांच्या चित्रांसोबत आवाज ऐकता येणार

पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजना या प्रकल्पात आखण्यात आल्या आहेत. खारफुटीविषयक माहितीच्या भित्तिपत्रकासोबत विविध जातींचे पक्षी, वनस्पती, खाडीकिनारची खारफुटी यांचे चित्र आणि माहिती पडद्यावर दिसणार आहे. पडद्यावर दिसणाऱ्या पक्ष्याचा आवाज कसा आहे हे जाणून घ्यायचे असल्यास त्या पक्ष्याजवळ असलेल्या बटणावर आपल्या बोटाने स्पर्श केल्यास संबंधित पक्ष्याचा आवाज पर्यटकांना कळेल, अशी सोय या केंद्रात करण्यात आली आहे. माहिती हवी असलेल्या वनस्पतीच्या बोधचिन्हावर स्पर्श केल्यास संबंधित वनस्पतीचे चित्र आणि माहिती उपलब्ध होते.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा

या पर्यटन केंद्राचे प्रवेश शुल्क प्रत्येकी पन्नास रुपये आहे. मात्र महापालिका शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी आठवडय़ातून एक दिवस मोफत सुविधा देण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनअधिकाऱ्यांना दिले.