भाजी विक्रेत्यामुळे अपघात होण्याची भीती; प्रवाशांनी प्रतिसाद न देण्याचे आवाहन
रेल्वे स्थानकाबाहेरचे अनधिकृत फेरीवाले आणि भाजी विक्रेते बदलापूरकरांसाठी काही नवीन नाहीत. मात्र बदलापूरच्या भाजी विक्रेत्यांनी अक्षरश: रेल्वे रुळाला खेटूनच ‘बाजार’ मांडला आहे. रेल्वे प्रवासीही त्यांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे एकाचे दोन आणि आता चार-पाच फेरीवाल्यांनी तेथे आपले बस्तान मांडले आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला फलाट क्रमांकएक आहे. बऱ्याचदा रेल्वे प्रवासी पादचारी पुलाचा वापर न करता, फलाटावरून उडय़ा मारून रेल्वे रूळ ओलांडून स्थानक सोडतात. तेथे संरक्षक भिंतीला दोन मोठे भगदाड पाडले असून तेथेच बाजूला फेरीवालेही आपली दुकाने थाटून बसतात. गेल्या काही दिवसांत रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे भाजी विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रस्त्याचे काम संपल्यानंतर त्यांनी पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा आपली दुकाने मांडली आहेत. मात्र त्यातल्या काहींनी थेट रेल्वेचा रूळ गाठला आहे. फलाट क्रमांक एकवर जेव्हा गाडी येते, तेव्हा हे भाजी विक्रेते आणि लोकलमधील अंतर खूप कमी असते. अशावेळी एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्रवासीही फलाटावर न उतरता विरुद्ध बाजूने उडय़ा मारून उतरतात आणि थेट भाजी विक्रेत्यांना गाठतात. संध्याकाळी हे भाजी विक्रेते थेट फलाट क्रमांक एक आणि दोन गाठतात आणि तेथेच विक्री सुरू करतात.
याकडे रेल्वे प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. संरक्षक भिंत पश्चिमेला नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे पायदान आणि फलाटामधील अंतर प्रवाशांना दाखवण्यापेक्षा स्थानकाबाहेरील संरक्षक भिंती उभ्या करव्यात, अशी मागणी केली जात आहे. तसेच एखादा अपघात होण्याआधी तेथून भाजीविक्रेते हटवण्याची आवश्यकता आहे. लवकरात लवकर रुळाजवळील भाजी विक्रेते हटवले गेले नाहीत तर तेथे आणखी विक्रेते बस्तान मांडण्याची शक्यता आहे.
बदलापूरचे स्टेशन प्रबंधक नारायण शेळके यांच्या निदर्शनास ही बाब आणली असता, त्यांनी असा प्रकार जर स्थानक परिसरात होत असेल तर त्याची सूचना रेल्वे पोलिसांना देऊन त्यावर त्वरित कारवाई केली जाईल, असे सांगितले. दरम्यान, रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता, यापुढे भाजी विक्रेते स्थानक परिसरात दिसणार नाहीत. पण प्रवाशांनीही अशा विक्रेत्यांकडून भाजी घेऊ नये, असे आवाहन उपनिरीक्षक शिवशरण प्रसाद यांनी केले. लवकरच संरक्षक भिंतही बांधली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.