सम-विषम तारखांची अट प्रशासनाकडून रद्द; तीव्र करोना संक्रमित क्षेत्रात जुने नियम लागू 

कल्याण : करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरातील सम-विषम तारखांना दुकाने सुरू ठेवण्याची अट प्रशासनाने मंगळवारी एका आदेशाने रद्द केली आहे. बुधवारी सकाळपासून तीव्र संक्रमित क्षेत्रातील दुकाने वगळता शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सर्व प्रकारची दुकाने व्यापारासाठी खुली राहतील, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत. नव्या नियमाने दुकानदारांना सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वेळेत दुकाने खुली ठेवता येणार आहेत.

दुकान संकुल, भाजी बाजार, मार्केट कॉम्प्लेक्स, जिम, पोहण्याचे तलाव यांना या नियमांतून वगळण्यात आले आहे. तीव्र करोना संक्रमित क्षेत्रात यापूर्वीसारखेच र्निबध कायम राहणार असून जुन्या नियमांप्रमाणे व्यावसायिकांना व्यवसाय करावा लागेल, असे प्रशासनाने सूचित केले आहे. गेल्या महिन्यापासून कल्याण, डोंबिवलीतील अनेक व्यापारी संघटनांनी आयुक्तांना निवेदन देऊन दोन्ही बाजूंची दुकाने सरसकट खुली करण्याची मागणी केली होती. माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही प्रशासनाकडे सणासुदीचे दिवस विचारात घेऊन सर्व प्रकारच्या बाजारपेठा खुल्या करण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. शहरातील करोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठा खुल्या करण्याचा निर्णय घेतला. दुकाने पूर्णवेळ सुरू केल्यानंतर दुकान मालक, तेथील कामगार, दुकानात येणारा ग्राहक यांनी मुखपट्टी, हस्ताच्छादन, जंतुनाशक यांचा वापर केला पाहिजे. दुकानात, बाहेर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन दुकानदारांनी व्यवसाय करायचा आहे, असे आदेश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत.