मुंबईपाठोपाठ ठाणे शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकाने आणि सर्वच बाजारपेठा शनिवारपासून पुन्हा सुरू झाल्या. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यामुळे नागरिक आठ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे चार महिन्यांनंतर बाजारपेठा पुन्हा गजबजल्याचे चित्र होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि दुकानदार नियमांचे पालन करताना दिसून आले.

जून महिन्यात टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ठाणे शहरातील बाजारपेठा आणि दुकाने सम-विषम पद्धतीने सुरूझाली. मात्र, करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे पालिका प्रशासनाने पुन्हा टाळेबंदी लागू केली. १८ दिवसांच्या टाळेबंदीनंतर प्रशासनाने पुन्हा सम-विषम पद्धतीने दुकाने आणि बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, सर्वच दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून होत होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य केल्यानंतर शनिवार सर्व बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या.

खबरदारी.. : दुकानदार ग्राहकांची प्रवेशद्वारावर तपासणी करून त्यांना प्रवेश देत होते, तर अनेकांनी दुकानाबाहेर सॅनिटायझर ठेवले होते. गर्दी होऊ नये आणि सर्वानी मुखपट्टीचा (मास्क) वापर करावा यासाठी या सर्वच ठिकाणी जाहीर घोषणा करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्यानुसार पालिकेसह पोलिसांची पथके बाजारपेठेसह शहरात गस्त घालून नियमांचे पालन करण्याच्या सूचना करीत होते.