ठाणे, कल्याण-डोंबिवलीत बाजारपेठा सुरू; पण व्यवहार तुरळक, व्यापारीही दक्ष

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील अतिसंक्रमित क्षेत्र वगळून इतर भागांत टाळेबंदी शिथिल केल्यानंतर सोमवारी सकाळपासून जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमधील व्यवहार सुरळीत झाल्याचे पाहायला मिळाले. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह इतर भागांतील बाजारपेठा, दुकाने सुरू झाली खरी, मात्र पहिल्याच दिवशी नागरिक आणि व्यापारी सावध पद्धतीने व्यवहार करताना दिसले. बाजार सुरू होताच गर्दी उसळेल ही भीती होती. प्रत्यक्षात असे घडले नाही.

ठाणे शहरातील जांभळीनाका भाजी आणि धान्य बाजार, गावदेवी, नौपाडा, ठाणे स्थानक परिसरात सम-विषम पद्धतीने दुकाने खुली करण्यात आली. सकाळी ग्राहकांची गर्दी कमी असली तरी रविवारी मध्यरात्रीपासूनच ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. त्यामुळे येथील हातगाडी किंवा रस्त्यावर विक्री करण्यासाठी येणारे भाजीपाला विक्रेते गायब होते, तर १७ दिवसांपासून बंद असलेली दुकाने उघडल्यानंतर आपला जुना, नाशवंत माल बाजूला सारण्यातच धान्य विक्रेत्यांचा बराचसा वेळ गेला.

टाळेबंदी शिथिल करत असताना महापालिकेने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरी नागरिकांमध्ये टाळेबंदीवरून अद्यापही संभ्रम असल्याने सकाळी खरेदीसाठी अत्यंत तुरळक गर्दी पाहायला मिळाली. भाजीपाला आणि धान्याची दुकाने सम आणि विषम पद्धतीने सुरू करण्यात आल्याने दुकान मालकांचीही गर्दी कमीच होती. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या भागात गस्त घालण्यात येत होती. या वेळी नागरिकांकडून अंतर नियमांचे पालन करण्यात येते की नाही, याची पाहणी करण्यात येत होती. पोलिसांकडूनही नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात होत्या. तसेच, बाजारात प्रवेश करण्याच्या ठिकाणी अडथळे बसविण्यात आले होते. त्यामुळे कोणालाही वाहने घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, खारटन रोड, नौपाडा, गोखले रोड या महत्त्वाच्या ठिकाणी सम आणि विषम पद्धतीने दुकाने सुरू केली होती.

येथील दुकानांमध्येही तुरळक गर्दी होती. महापालिकेने दुकानांना ५ वाजेपर्यंत दुकानांना परवानगी दिली असली तरीही भाजीपाला बाजार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे ११ वाजेनंतर खरेदीसाठी गेलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ठाण्यातील धान्यबाजारही १ वाजता बंद करण्यात आला. दुपारी १ वाजेनंतर दुकाने बंद करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती.

छुप्या पद्धतीने भाजीविक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई

टाळेबंदीच्या काळात तलावपाळी, जांभळीनाका येथील रस्त्याकडेला मोठय़ा प्रमाणात बेकायदा भाजीविक्री सुरू होती. पहाटे ४ किंवा त्याही आधी हे भाजीविक्रेते भाजी विकत होते. या भाजीविक्रेत्यांवर सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मध्यरात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत भाजीविक्री करणाऱ्या या विक्रेत्यांविरोधात महापालिकेने कारवाई केली. यामध्ये सुमारे १५० जणांविरोधात जांभळीनाका, तलावपाळी तसेच ठाणे स्थानक परिसरात कारवाई करण्यात आली, तर हाजुरी, खारटन रोड, नौपाडा, कळवा नाका भागातील सुमारे १०० जणांविरोधात कारवाई केली. यासह अंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजीबाजारातील ११ दुकानदारांविरोधात कारवाई झाल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई

तलावपाळी, जांभळी नाका, कळवा नाका, हाजुरी, जवाहरभाग परिसरात अनधिकृत फेरीवाले मध्यरात्रीपासूनच भाजीविक्रीसाठी येत असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना मिळाली होती. या फेरीवाल्यांकडून नियमभंग होत असून करोनाचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मध्यरात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांनी अनधिकृत भाजीविक्री करणाऱ्या २५० फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. यात महापालिकेने पाच टेम्पो आणि फेरीवाल्यांच्या वस्तू जप्त केल्या. तसेच ७ हातगाडय़ा मोडून टाकल्या. अंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११ दुकानदारांवरही महापालिकेने कारवाई केली. उपायुक्त संदीप माळवी आणि नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.